शेवटपर्यंत उमेदवार गुलदस्तात
By Admin | Updated: February 6, 2017 05:58 IST2017-02-06T05:58:38+5:302017-02-06T05:58:38+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी आपले उमेदवार गुलदस्तात ठेवल्याचे चित्र आहे

शेवटपर्यंत उमेदवार गुलदस्तात
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी आपले उमेदवार गुलदस्तात ठेवल्याचे चित्र आहे. काँग्रेसने फक्त १५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, शिवसेनेने तालुका पातळीवर यादी जाहीर न करता उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना वैयक्तिक पातळीवर दिल्या आहेत. राष्ट्रवादीनेही काही उमेदवारांना तोंडी सूचना देऊन अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्या अर्ज भरल्यानंतरच पक्षाकडून कोण रिंगणात, हे समजणार आहे.
उमेदवार यादी जाहीर केल्यास असंतुष्ट उमेदवाराला प्रतिस्पर्धी पक्ष जाळ्यात ओढेल, या भीतीने अगदी ऐनवेळी नावे जाहीर करण्याचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे.
सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ४१ सदस्य राष्ट्रवादीचे असून, काँग्रेसचे ११, शिवसेनेचे १२ व भाजपाचे फक्त ३ सदस्य आहेत. सध्याची परिस्थिती पाहता युती व आघाडी न झाल्याने सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवित आहेत.
जिल्ह्यात भाजपाचे म्हणावे तसे अस्तित्व नाही. मात्र, ७५ जागा लढवून जिल्ह्यातही मुसंडी मारण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी भाजपाला उमेदवारच नाहीत. त्यात उलट परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे उमेदवार अंतिम करताना त्यांची मोठी कसरत होत आहे. जर अगोदरच पक्षाचे उमेदवार अंतिम केले, तर मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीने आजही आपली उमेदवार यादी जाहीर केली नाही. त्यामुळे इच्छुक मात्र तळ््यात मळ््यात आहेत. काँग्रेसने १५ उमेदवारांची आपली पहिली यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. मात्र, तेथे इतर इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांनी यादी जाहीर करून इतर पक्षांनी यादी जाहीर करावी, असे वातावरण निर्माण केले. मात्र, इतरांनी सावध पवित्रा
घेत शेवटपर्यंत यादी जाहीर केली नाही. १ फेब्रुवारी रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे हे त्यांची यादी जाहीर करणार होते.
मात्र, त्यांनीही यादी जाहीर केली नाही. शिवसेनेने तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांना तोंडी सांगून
उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्या कोअर कमिटीची बैैठक सुरू असून, उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत अंतिम करीत आहोत, उद्या
सकाळी तालुका अध्यक्षांना यादी देऊन उमेदवार अंतिम होतील, असे सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांच्याशी संपर्क केला असता, आमची अंतिम यादी तयार आहे. उद्या शेवटच्या क्षणी आम्ही ती जाहीर करणार आहोत. आमच्याकडेही इच्छुकांची संख्या जास्त आहे. आमच्यातील नाराज दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून ही काळजी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७ अंतर्गत जिल्ह्यातून रविवारी पाचव्या दिवशी जिल्हा परिषद गटांसाठी १७३, तर पंचायत समिती गणांसाठी ३१४ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तसेच आजअखेर गटांसाठी २७९, तर गणांसाठी ४९० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
आज दाखल
झालेले अर्ज
जुन्नर- १५ (३८),
आंबेगाव- ११ (२१),
शिरूर- १३ (२६),
खेड- १२(३३),
मावळ- २ (१४),
मुळशी- ५(१८),
हवेली- ३८ (५१),
दौंड- १४ (१८),
पुरंदर- १२ (२६),
वेल्हा- २ (५),
भोर- ५ (१०),
बारामती- १४ (२१),
इंदापूर - २८ (३३).