लघु उद्योगांच्या सुरक्षेचे तीनतेरा
By Admin | Updated: October 15, 2016 06:02 IST2016-10-15T06:02:27+5:302016-10-15T06:02:27+5:30
औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता व धास्ती

लघु उद्योगांच्या सुरक्षेचे तीनतेरा
रिझवान शेख / कुरकुंभ
कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता व धास्ती आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीनुसार लघु उद्योगांचे सुरक्षा आॅडिट प्रत्येक सहा महिन्यांत होणे गरजेचे आहे. मात्र कित्येक दिवसांपासून ते झालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात वाढत्या अपघाताच्या संख्येत कित्येक जणांचे बळी गेले, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले असल्याचे वास्तव समोर येत आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीत आग लागण्याच्या दोन गंभीर घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक ताजी आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाच्या कार्यालयात सुरक्षा आॅडिट केलेले प्रमाणपत्र प्रत्येक सहा महिन्यांत जमा होणे गरजेचे आहे. मात्र कित्येक वर्षांपासून हे प्रमाणपत्र कुठल्याही रासायनिक प्रकल्पाने सादर केलेले नाही. परिणामी अग्निशामक दलाला उपलब्ध रसायनांची व सुरक्षा साधनांची माहितीच मिळत नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अनेक अडचणी निर्माण होत असतात.