नाशिक-मुंबई महामार्गावर हवालाचे ४५ लाख रुपये लुटणारे तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By विवेक भुसे | Published: February 17, 2024 10:50 AM2024-02-17T10:50:01+5:302024-02-17T10:51:29+5:30

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली....

Three police personnel who looted 45 lakh hawala on Nashik-Mumbai highway dismissed | नाशिक-मुंबई महामार्गावर हवालाचे ४५ लाख रुपये लुटणारे तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ

नाशिक-मुंबई महामार्गावर हवालाचे ४५ लाख रुपये लुटणारे तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ

पुणे : नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस दलातील तिघा कर्मचार्‍यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली.
पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते सर्व जण दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना ८ मार्च २०२२ रोजी सकाळी हा प्रकार घडला होता. तिघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

गणेश कांबळे याला बाबुभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे औरंगाबादमधून नाशिक मार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याने गणेश शिंदे आणि दिलीप पिलाणे यांच्याशी संगनमत करुन भिवंडीजवळील दिवे गावात हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडविली. पोलिस असल्याचा धाक दाखवून वाहनाची तपासणी करुन कारवाई करण्याची भिती दाखवून गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन त्यांना तेथून हाकलून दिले होते. जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन सीक पास मिळविला.

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडी येथे जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही म्हणून  साप्ताहिक सुट्टी घेतो, असे खोटे कारण दाखवून सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Web Title: Three police personnel who looted 45 lakh hawala on Nashik-Mumbai highway dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.