मोबाईल चोरी करणारी तीन अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:37 IST2017-08-18T15:36:25+5:302017-08-18T15:37:53+5:30
मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणावळा ग्रामीण पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

मोबाईल चोरी करणारी तीन अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात
लोणावळा, दि. 18- मळवली (ता.मावळ) येथील भाजे धबधबा आणि लेणी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनाच्या बॅगा लंपास करून त्यातील मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणावळा ग्रामीण पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
मळवलीजवळील भाजे धबधबा आणि लेणी परिसरात मागील काही दिवसात पर्यटकांचे मोबाईल व बॅगांची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या घटनांमागे टोळी असण्याची शक्यता ध्यानात घेत लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशात या परिसरात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी शरद जाधवर व गणेश होळकर यांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या मुलांकडून ९ चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून अजूनही काही मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक आशिष काळे हे करीत असून ज्या लोकांचे मोबाईल या परिसरातून चोरीला गेलेत त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.