कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणाऱ्या तीन लॅब ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:33+5:302021-03-09T04:12:33+5:30

पुणे : कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या तसेच त्याचे व्यवस्थित रेकॉर्ड न ठेवणाऱ्या तीन लॅबला महापालिकेने दणका ...

Three Labs 'Seal' Insufficient Information on Corona Patients | कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणाऱ्या तीन लॅब ‘सील’

कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणाऱ्या तीन लॅब ‘सील’

पुणे : कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या तसेच त्याचे व्यवस्थित रेकॉर्ड न ठेवणाऱ्या तीन लॅबला महापालिकेने दणका दिला आहे. या चुकांमुळे जवळपास ३० टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत असून, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे या तीनही लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असूनही संख्या एक हजाराच्या जवळ जाऊन पोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही मागील तीन आठवड्यांत कमालीची वाढली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या काळात शहरातील शासकीय तपासणी केंद्रांसह खासगी लॅबमधील तपासणी केंद्रांवर नागरिकांकडून स्वाब चाचणी केली जात आहे. ही चाचणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबरसह सर्व अद्ययावत माहिती पालिकेने दिलेल्या नमुन्यामध्ये भरुन देणे आवश्यक आहे. त्याचा दैनंदिन अहवाल शासनास पाठवावा लागतो.

खासगी प्रयोग शाळांनी ही सर्व आवश्यक माहिती बिनचूक भरुन वेळेत पालिकेला देणे आवश्यक आहे. परंतु, या प्रयोगशाळांकडून ही माहिती वेळेत दिली जात नाही. तसेच, अपूर्ण माहिती दिली जाते. काही रुग्णांचे मोबाईल नंबर देण्यात आलेले नाहीत. तर, काहींचे पत्ते अपूर्ण आहेत. काही रुग्णांच्या पुढे तर केवळ पुणे एवढाच उल्लेख करुन माहिती देण्यात आलेली आहे. याबाबत, पालिकेने वारंवार तोंडी अथवा फोनद्वारे सूचना दिलेल्या होत्या. तसेच लेखी खुलासा मागविण्यात आलेला होता.

पत्ते अपूर्ण असल्यामुळे तसेच मोबाईल क्रमांक नसल्याने या रुग्णांचा शोधच लागत नाही. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यामध्ये (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रकार गंभीर असून प्रयोगशाळांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी लॅब सील करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश होईपर्यंत या प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचण्या न करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Web Title: Three Labs 'Seal' Insufficient Information on Corona Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.