नाणे मावळमध्ये वीज पडून तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:21 IST2018-11-05T01:20:48+5:302018-11-05T01:21:05+5:30
अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

नाणे मावळमध्ये वीज पडून तीन ठार
कामशेत - अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भातकापणी करीत असताना या तिघांवर काळाने घाला घातला.
वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्यांमध्ये शोभा अंकुश शिरसट (वय ३२), खंडू धोंडू शिरसट (वय अंदाजे ५०, रा. दोघेही नेसावे, मावळ) यांचा समावेश आहे. तर साई कचरेवाडीत अंगावर वीज पडून सुनंदा भाऊ कचरे (वय ४०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनेत नाणेमावळातील तिघांना जीव गमवावा लागला. भात कापणीसाठी शोभा अंकुश शिरसट, अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट असे एकाच कुटुंबातील सदस्य गेले होते. अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट हे शेतात भात रचत होते. तर या वेळी अचानक आलेल्या वळवाच्या पावसापासून बचाव व्हावा म्हणून शोभा अंकुश शिरसट या वडाच्या झाडाखाली उभ्या होत्या. या वेळी खंडू धोंडू शिरसट झाडाखाली बसले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात शोभा अंकुश शिरसट व खंडू धोंडू शिरसट यांचा जागीच
मृत्यू झाला.