कोंढवा येथे सिलेंडरच्या स्फोटात तीन संसार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 19:29 IST2019-02-01T19:29:11+5:302019-02-01T19:29:54+5:30
कोंढवा बुद्रुक येथे घरातील सिलेंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत तीन कुटुंबाच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे.

कोंढवा येथे सिलेंडरच्या स्फोटात तीन संसार जळून खाक
पुणे : कोंढवा बुद्रुक येथे घरातील सिलेंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत तीन कुटुंबाच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. या कुुटुंबाना राहायला छत राहिले नाही की रोजच्या संसारोपयोगी वस्तू...जगण्यासाठी पुन्हा नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती मधील दुपारी २.३० च्या सुमारास वाघमारे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्राच्या खोल्यांमध्ये ही घटना घडली. २.३० च्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना ऐकू आला. वाघमारे यांच्या घराच्या दुस?्या मजल्यावर तीन पत्र्याच्या खोल्या असून यात भाडेकरू राहत होते. हा स्फोट कोणत्या कारणास्तव झाला याचे कारण कळू शकले नाही. या खोलीचे पत्रे स्फोटामुळे उंच उडाले व घरांतील साहित्याला आग लागली. बघता बघता आग शेजारी असलेल्या इतर खोल्यांमध्ये पसरली व या खोल्यांमध्ये असलेले दोन सिलेंडर एका मागोमाग फुटले. ज्यामुळे या तिन्ही खोल्यांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घरांतील वस्तू सर्वत्र फेकल्या गेल्या. यावेळी या घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.
कोंढवा बुद्रुक व खुर्द या अग्निशमन दलाच्या तसेच मुख्य अग्निशमन दलाच्या एका गाडीने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. गल्लीत असलेले अरुंद रस्ते व रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. एका खोलीत राहत असलेल्या ललिता परमेश्वर बनसोडे यांच्या घरातील बंद कपाटात असलेले सोन्याचे दागिने सहीसलामत मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तांडेल सुभाष जाधव, अजय बेलोसे, संग्राम देशमुख, ताठे, रवी बारटक्के, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, शफीक सय्यद, आकाश पवार, विशाल यादव या अग्निशमन दलाच्या जवानांनी शथीर्चे प्रयत्न करून ही आग विझवली.