अॅम्ब्युलन्सच्या अपघातात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2017 00:09 IST2017-01-28T00:09:53+5:302017-01-28T00:09:53+5:30
करडे (ता. शिरूर) येथे अॅम्ब्युलन्सचालकाच्या बेफिकिरीमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तर अन्य ५ गंभीर जखमी झाले.

अॅम्ब्युलन्सच्या अपघातात तिघांचा मृत्यू
निमोणे/न्हावरे : करडे (ता. शिरूर) येथे अॅम्ब्युलन्सचालकाच्या बेफिकिरीमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तर अन्य ५ गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी झाला.
न्हावरे (ता. शिरूर) येथे काळे कटुंबीय राहतात. कुटुंबप्रमुख बापू शंकर काळे हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना न्हावरे येथीलच ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले असता, पेशंटला शिरूर किंवा पुणे येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार, ‘नॅशनल अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस’ची अॅम्ब्युलन्स (एमएच १२ -एफसी ९७९६) रुणालय कर्मचारी सदाशिव तुकाराम मोरे व पेशंटचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांसह शिरूरकडे निघाली.
त्या वेळी विकास धोंडिबा आखुटे गाडी चालवत होता. चालक सर्व वाहतुकीचे नियम डावलून बेफिकीरपणे भरधाव गाडी चालवत होता. रात्री ९.५०च्या सुमारास अॅम्ब्युलन्स करडे (ता. शिरूर) परिसरातील भैरवनाथ लॉन्स परिसरात शिरूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टाटा टेम्पोने हुलकावणी दिली. याच वेळी अॅम्ब्युलन्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वडाच्या झाडाला धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती, की वडाच्या झाडाचे दोन भाग होऊन एक भाग अॅम्ब्युलन्समध्ये घुसला. या भीषण अपघातात पेशंट बापू शंकर काळे (वय ६०), नातेवाईक राणी मोहन माने (वय २५) व चालकाशेजारी बसलेले आरोग्य कर्मचारी सदाशिव तुकाराम मोरे (वय ५५) हे जागीच ठार झाले. जबरदस्त धडक बसल्याने मृतदेहांचे तुकडे झाले होते. तर, मागे बसलेले मुलगा प्रकाश बापू काळे, त्याचे मित्र नीलेश राजेंद्र शेळके, सुमीर इकबाल शेख, सोहेल बाबू शेख, चालक विकास धोंडिबा आखोटे हे गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी जखमींना विविध स्थानिक खासगी रुग्णालयांत दाखल केले.
पेशंटचा जीव वाचविण्यासाठी निघालेली अॅम्ब्युलन्स चालकाच्या बेफिकिरीमुळे अपघातग्रस्त झाल्याने जीवनदायी असणारी कर्दनकाळ ठरली. चालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.