जीवे मारण्याच्या धमकीने भय वाटू लागलंय, कोरेगाव भीमा प्रकरणातील पीडितांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 20:23 IST2018-04-06T20:23:58+5:302018-04-06T20:23:58+5:30
रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सणसवाडीतील रमा आठवले, कोरेगाव भीमा येथील जयदीप सकट, अंजना गायकवाड आदींनी आपली व्यथा मांडली.

जीवे मारण्याच्या धमकीने भय वाटू लागलंय, कोरेगाव भीमा प्रकरणातील पीडितांची व्यथा
पुणे : आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करून खैरलांजी करण्याचा डाव काही लोकांनी केला आहे. त्यांची मनमानी वाढली आहे.१ जानेवारी रोजी शौर्य दिनी कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या दलित बांधवांना चहा पाणी का केले, याचा राग धरून त्रास देण्याचे काम सुरू आहे. गावातून हद्दपार व्हावे लागले असून सातत्याने मारून टाकण्याच्या धमक्यांनी भय वाटू लागल्याची भावना कोरेगाव भीमा हल्ल्यातील पीडितांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सणसवाडीतील रमा आठवले, कोरेगाव भीमा येथील जयदीप सकट, अंजना गायकवाड आदींनी आपली व्यथा मांडली. शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतु, त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. गेल्या २५ वर्षांपासून सणसवाडी येथे राहणाऱ्या रमा आठवले यांना मारण्याच्या धमक्या येत असल्याचे यावेळी सांगितले. कोरेगाव भीमामधील तणाव वाढल्यानंतर दोन महिन्यांसाठी पिंपरी-चिंचवडला गेले. त्यानंतर आता चंदननगर येथे राहत आहे. १ जानेवारी रोजी शौर्यदिनी येणाऱ्या लोकांना चहापाणी करण्याची गरज काय होती, या प्रकरणाचा राग धरून विनाकारण त्रास दिला जात आहे. आमचे फॅब्रिकेटर्सचे दुकानदेखील जाळले आहे. मागील तीन महिन्यांपासून शासनाकडून कुठलीच मदत नसल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली.
तीन महिन्यांपासून पीडित कुटुंबे आपल्या गावापासून लांब आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जिल्हा व राज्य प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे कोरेगाव भीमा हल्लाप्रकरण केस उच्च न्यायालयात दाखल करणे, त्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपविणे, पुनर्वसनकरिता विशेष विभाग व अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आदी मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरेगाव भीमा येथे साजरी करणार असून यासाठी पोलिसांनी पूर्ण संरक्षण, आवश्यक त्या परवानग्या घेण्यासाठी शनिवारी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.