महाराष्ट्रात यंदा थंडीचा कडाका नाहीच! हवामान विभागाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Published: December 2, 2023 05:08 PM2023-12-02T17:08:06+5:302023-12-02T17:10:03+5:30

सध्या हिवाळ्यामध्ये उकाडा जाणवत असल्याचे अनुभवायला येत आहे...

This year in Maharashtra, the cold is not severe! Forecast by Meteorological Department | महाराष्ट्रात यंदा थंडीचा कडाका नाहीच! हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात यंदा थंडीचा कडाका नाहीच! हवामान विभागाचा अंदाज

पुणे : यंदा पावसाळा जाणवलाच नाही, कारण कमी पाऊस पडला. तसेच यंदा थंडी देखील खूप पडणार नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक भागात किमान तापमान अधिक राहणार असल्याने थंडीची लाट येणार नाही, डिसेंबरच्या अखेरीस देखील किमान तापमान अधिकच राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. देशातील हिवाळा कसा असेल, याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.

हिवाळ्यामध्ये उकाडा जाणवत असल्याचे अनुभवायला येत आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या वरच नोंदवले गेले. परिणामी थंडी अधिक पडली नाही. आता गेल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागात तर वादळी पावसासह गारपीट झाली. त्यानंतर लगेच किमान तापमानात वाढ पहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात ३३.५ मिलिमीटर म्हणजे सरासरीपेक्षा ८८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून थंड वारे जोरात येत असल्याने काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात थंडी पडली. परंतु, राज्याच्या इतर भागात थंडीची प्रतीक्षाच करावी लागली आहे. 

मध्य आणि उत्तर भारत वगळता उर्वरित देशामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने थंडी जाणवणार नाही. डिसेंबरमध्ये उत्तरेकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक, दक्षिण भारतात सरासरी इतक्या आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: This year in Maharashtra, the cold is not severe! Forecast by Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.