पुणे : शहरातील खराडी परिसरातील एका स्टे बर्ड, अझुर सूट नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे मोठी कारवाई केली. पहाटे साडेतीनच्या सुमारास धाड टाकून सुरू असलेली पार्टी पोलिसांनी उधळून लावली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर याच्या नावे गेल्या तीन दिवसांपासून या हॉटेलचे ३ फ्लॅट बुक होते. त्यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
पोलिसांनी ड्रग्ज पार्टीवर छापा मारला त्यावेळी फक्त हाय प्रोफाईल पार्टी असल्याची माहिती पोलिसांकडे होती. छाप्यादरम्यान पोलिस आरोपींचे नाव, पत्ते विचारत असताना प्रांजल खेवलकर याची पार्श्वभूमी समोर आली. त्यावेळी आरोपींपैकी एकाने पोलिसांशी बोलताना, प्रांजलकडे बघून ‘याच्यामुळे आमचा गेम झाला’ असे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. यावेळी घटनास्थळाच्या परिसरातून तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. यावेळी रुम नं. १०२ मध्ये डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, प्लॉट नं. ५७-५८, इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, माळवाडी रोड), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, रा. २०५, हेरिटेज पॅलेस, ओर्चिड सोसायटी, एनआयबीएम रोड), सचिन सोनाजी भोंबे (४२, रा. प्लॉट नं. ५१, द्वारकानगर, वाघोली), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, पंचतारा नगर, आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, रा. गोदरेज ग्रीन को. म्हाळुंगे) यांच्या ताब्यातून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट, दारू व बीअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे अमली पदार्थ असे ४१ लाख ३५ हजार ४०० रुपयांचे पदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले. सातही आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २२(ब)(।।)अ, २१ (ब), २७ कोटपा ७(२), २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.