चोर, दरोडेखोरांना उपनगरांत मोकळे रान
By Admin | Updated: August 17, 2015 02:36 IST2015-08-17T02:36:09+5:302015-08-17T02:36:09+5:30
रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याचा फायदा घेत चोर, दरोडेखोरांना उपनगरांत मोकळे रान मिळाले आहे. चालत जाणाऱ्या तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारीतून पळवून नेऊन

चोर, दरोडेखोरांना उपनगरांत मोकळे रान
पुणे : रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याचा फायदा घेत चोर, दरोडेखोरांना उपनगरांत मोकळे रान मिळाले आहे. चालत जाणाऱ्या तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारीतून पळवून नेऊन पिस्तूल, चाकूचा धाक दाखवीत रोख व मोबाईल अशा ७१ हजार रुपयांनी लुबाडण्यात आले. वडगाव उड्डाण पुलाजवळ नेऊन ५ तासांनी दिघी येथे सोडून देताना त्याच्या डोळ्यांवर मिरचीचा स्प्रे मारण्यात आला.
चंदन शर्मा (वय २०, रा़ आंबेगाव बुद्रुक, मूळ राजस्थान) असे त्याचे नाव आहे. सिंहगड कॉलेजमध्ये एम.बी.ए.च्या पहिल्या वर्गात तो शिकतो. तेथेच हॉस्टेलमध्ये राहतो. गुरुवारी रात्री वाकड येथे मोबाईल खरेदी करून तो परत चालला होता. रात्री ८ च्या सुमारास तो मुंबई महामार्गावर होता.
वडगाव उड्डाणपुलाजवळील एका बिर्याणी हॉटेलजवळ मोटारीतून आलेल्या दोघांनी त्याच्याजवळ थांबून कहाँ जाना है असे विचारले. त्याने आंबेगावच्या सिंहगड कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले. आपल्यालाही तिकडे जायचे असल्याचा बहाणा करत त्याला मोटारीत बसविण्यात आले. मोटार निर्जन भागात गेल्यानंतर मागे बसलेल्याने त्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखविला. रिव्हॉल्व त्याच्या डोक्याला लावण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाईल काढून घेण्यात आले.
चंदन याच्याकडून एटीएम कार्ड काढून घेत त्याचा कोडवर्ड माहिती करून घेण्यात आला. एका एटीएममधून २५ हजार आणि आणखी एका एटीएममधून २५ हजार रुपये काढण्यात आले. ५ तासांनी रात्री १ पूर्वी दिघी येथे नेऊन त्याचे पॅन कार्ड, मतदान कार्ड, अन्य कागदपत्रे काढून घेण्यात आली. त्याला मोटारीतून उतरविण्यात आले. त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडरचा स्प्रे मारण्यात आला.