दौंडला स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:02+5:302021-04-11T04:11:02+5:30
दौंड : दौंड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जागा अपूर्ण पडत असल्याने स्मशानभूमीच्या आसपास अंत्यविधी करावे लागत असल्याचे विदारक ...

दौंडला स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा नाही
दौंड : दौंड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जागा अपूर्ण पडत असल्याने स्मशानभूमीच्या आसपास अंत्यविधी करावे लागत असल्याचे विदारक चित्र दौंडमध्ये सध्या पाहायला मिळत आहे.
कोरोनाबाधित अनेक रुग्ण दौंड तालुक्यातून दौंड शहरात उपचारासाठी येत आहेत. कोरोनाने त्यांचा मृत्यू झाल्यास नगर परिषद मृतदेह ताब्यत घेते आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जातात. सध्या कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने त्याचा मोठा ताण नगर परिषद प्रशासनावर येत आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी तीन ओटे आहेत, गेल्या दिवसात सुमारे पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे स्मशानभूमीत ओटे अंत्यसंस्कारासाठी कमी पडले. त्यामुळे ओट्यांच्या व्यतिरिक्त स्मशानभूमीतच इतर ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागले आसल्याचे नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील रुग्णाचे मृतदेह रॅप करुन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यास या मृतदेहांवर ग्रामीण भागात त्यांच्यागावी अंत्यसंस्कार होऊ शकतील. परिणामी दौंडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अडचणी येणार नाहीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे, त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयास मृतदेह रॅप करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
--
चौकट
सावडण्याचा विधी तातडीने करावा
--
दौंडच्या हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सावडण्याचा कार्यक्रम दोन किंवा तीन दिवसांनी केला जातो. परिणामी जागा अडून राहते तेव्हा सावडण्याचा कार्यक्रम तातडीने केल्यास इतर मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी जागा मिळेल, असे आवाहन हिंदू स्मशान भूमी सुधार समितीचे सचिन कुलथे, गणेश दळवी , रामेश्वर मंत्री यांनी केले आहे.
--
फोटो क्रमांक : १०दौंड स्मशानभुमी मृतदेह
ओळी : दौंड येथील स्मशानभूमीत मिळेल त्या जागेवर अंत्यसंस्कार केले जात आहे.