पुणे : 'लाडक्या बहिणीसाठी मागील काही महिन्यांपासून सरकार सातत्याने दलित, आदिवासी यांचा निधी इतर ठिकाणी वळवला जात असल्याचा संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री आरोप केला जात आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. जादा निधी मिळण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी तातडीने निधी वितरित केला आहे. त्यामुळे आता निधीची कमतरता नाही,' असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पुण्यात बालगंधर्व येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेना आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याच्या चर्चावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'ठाकरे कुटुंब एकत्र यावं, यावर आमच्याकडून शुभेच्छा आहेत. भेट झाली, यात काही राजकीय चर्चा झाल्या असतील. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना भेटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला बोलावलं तर मी नक्कीच भेटायला जाईन. पण त्यानंतर पुन्हाराजकीय चर्चा करू नका.'आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पोरानं चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी. भविष्यात ते चांगले, मोठे नेते व्हावेत ही मनापासून शुभेच्छा.' असेही यावेळी शिरसाट म्हणाले. त्याचबरोबर गुजरातहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. 'ही विमान दुर्घटना संपूर्ण देशाला जागं करणारी होती. मन हेलावणारी घटना आहे."