पक्षांची उमेदवारी अजून गुलदस्तातच

By Admin | Updated: January 29, 2017 03:56 IST2017-01-29T03:56:59+5:302017-01-29T03:56:59+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे चार दिवस राहिले आहेत. मात्र, अद्यापही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात

There are no other party candidates yet | पक्षांची उमेदवारी अजून गुलदस्तातच

पक्षांची उमेदवारी अजून गुलदस्तातच

भोर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे चार दिवस राहिले आहेत. मात्र, अद्यापही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवले आहेत. पहिले कोण उमेदवारी जाहीर करणार? कुणाच्या नावाची लॉटरी निघणार, याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी बंडखोरी किंवा पक्षांतर होण्याच्या भीतीने भोर तालुक्यातील कोणत्याच राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
भोर तालुक्यातील लोकसंख्या कमी झाल्याने निकषात बसत नसल्याने चारपैकी जिल्हा परिषदेचा एक गट आणी पंचायत समितीचे दोन गण कमी झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी मिळाली नाही तर पक्षांतर होणार आहे. काही जण बंडखोरी करण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघ्या चार दिवसांवर आली असतानाही तालुक्यातील कोणत्याच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पहले आप, पहले आपच्या नादात गाडी सुटून जायची अशी तऱ्हा भोर तालुक्यातील राजकीय पक्षांची झाली आहे.
१० वर्षांनंतर भोर पंचायत समितीचे सभापतिपद पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीत भोर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. २००७ मध्ये पण सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा सभापतिपद महिलेसाठीच राखीव झाल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. भोर तालुक्यात ६ पैकी वेळू व भोलावडे हे दोन गण सर्वसाधारण महिलेसाठी व कारी हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. यामुळे या तीन गणांतील महिलाच सभापती होऊ शकतात.
तालुक्यातील कोणत्याच राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार जाहीर केले नाहीत. सभापती आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने वेळू व भोलावडे या सर्वसाधारण महिला गणात उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षात अत्यंत चुरस वाढली असून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.
२००७ मध्ये सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्या वेळी राष्ट्रवादीच्या हेमलता बांदल या सभापती झाल्या होत्या. २०१४ मध्ये सभापतिपद सर्वसाधारण असताना राष्ट्रवादीच्या सुनीता बाठे या सभापती झाल्या होत्या. २००७ मध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर व २०१२ मध्ये शिवसेनेला बरोबर घेऊन मागील १० वर्षांपासून भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पंचायत समितीची सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीकडूनतर १० वर्षांपूर्वी गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जाणार असून तशी व्यहरचनाही सुरू आहे. पंचायत समितीच्या सत्तेच्या स्पर्धेत शिवसेनाही मागे नाही.

प्रचार शिगेला : लॉटरी कुणाला लागते याकडे लक्ष
भोर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा अशी चौरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी अपक्षही आपला उमेदवारी अर्ज भरतील, अशी परिस्थिती आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार एकत्रित प्रचार करीत आहेत. काही जण उमेदवारी आपल्यालाच मिळाल्याचे सांगत आहेत. सर्वच पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. मात्र निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघ्या चार दिवसांवर आली असतानाही कोणत्याच राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले नाहीत. उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. उमेदवारीची लॉटरी कुणाला लागते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

Web Title: There are no other party candidates yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.