‘...तर दोन नंबरचा धंदा बंद करतो’
By Admin | Updated: August 17, 2016 00:54 IST2016-08-17T00:54:40+5:302016-08-17T00:54:40+5:30
तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्यासाठी एकाने आगळीवेगळी अट घातली. ग्रामसभेने एकमताने मला अध्यक्षपद द्यावे, मी माझा दोन नंबरचा धंदा बंद करतो

‘...तर दोन नंबरचा धंदा बंद करतो’
पिंपरी : तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्यासाठी एकाने आगळीवेगळी अट घातली. ग्रामसभेने एकमताने मला अध्यक्षपद द्यावे, मी माझा दोन नंबरचा धंदा बंद करतो, अशी ती अट होती. एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत. सफाई कर्मचारी असून, ते चांगले काम करतात, त्यांची ‘सोय’ मात्र मी करीन, अशी भलतीच आरोळीही त्यांनी ठोकली. भर ग्रामसभेत घडलेल्या या घटनेची चर्चा मात्र पंचक्रोशीत झाली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी देहूगाव येथे ग्रामसभा झाली. सभेपुढे तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसह विविध विषय होते. ग्रामस्थांसह तरुणांनी सभेला मोठी गर्दी केली होती. सरपंच सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ग्रामसेवकांनी विषयपत्रिका वाचून दाखविली. त्यावर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करणे हा आठव्या क्रमांकाचा विषय होता. या पदासाठी इच्छुकांनी नावे द्यावीत, असे आवाहन ग्रामसेवकांनी केले. यासह अध्यक्ष कसा असावा, त्याबाबतचे निकषही सभेत वाचून दाखविले.
गोंधळ वाढत गेल्याने सरपंचांनी हा विषय तहकूब ठेवला. त्यामुळे अध्यक्षांची निवड झाली नाही. मात्र, अध्यक्षपदासाठी दारूधंद्यावाल्याने आगळीवेगळी अट घातल्याने याबाबतची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होती. (प्रतिनिधी)