...तर उजनीमध्ये वाढेल १५ टीएमसी पाणीसाठा
By Admin | Updated: May 10, 2017 03:49 IST2017-05-10T03:49:00+5:302017-05-10T03:49:00+5:30
उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा

...तर उजनीमध्ये वाढेल १५ टीएमसी पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा किमान पंधरा टीएमसीपर्यंत वाढणार आहे; मात्र गाळ काढण्याची प्रक्रिया सध्या टेंडर मागणीच्या अवस्थेत आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी ठेका घेणाऱ्या कंपनीस १५ वर्षे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या ‘चट मंगनी पट शादी’ या अपेक्षेला गोगलगायीचे पाय लागणार, असे एकंदरीत चित्र आहे.
उजनीसारख्या राज्यातील पाच मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यासंदर्भातील धोरण जाहीर करून जलसाठवणूक क्षमता वाढवण्याचा इरादा राज्यशासनाने स्पष्ट केला आहे. सहा वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये नवीन दिल्ली येथील तेजो विकास इंटरनॅशनल प्रा.लि.या संस्थेने डीजीपीएस या तंत्रज्ञानाद्वारे उजनी धरणाचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार त्यावेळी धरणात १४.९७ टीएमसी गाळ साठल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या सहा वर्षात गाळाचे प्रमाण ही निश्चितपणे वाढलेले असणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.