बॅगमधील ७५ हजार रुपये किमतीच्या ऐवजची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:40+5:302021-02-05T05:10:40+5:30
याप्रकरणी सुरेखा चंद्रकांत जवळकर (वय ४८, रा. १०७२, ए अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश ...

बॅगमधील ७५ हजार रुपये किमतीच्या ऐवजची चोरी
याप्रकरणी सुरेखा चंद्रकांत जवळकर (वय ४८, रा. १०७२, ए अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश पाटील (नाव, पत्ता माहीत नाही) यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर या जिल्हा परिषद सोलापूर येथे नोकरी करतात. त्यांची मोठी मुलगी शिवानी चेतन मुसळे हिचे लग्न झाले असून, ती सांताक्रूज मुंबई येथे तिच्या पतीसह राहण्यास आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी योगेश पाटील नावाच्या इसमाशी त्यांची करमाळा सोलापूर येथे ओळख झाली होती. त्यानंतर त्याने जवळकर यांचा मोबाईल नंबर घेतला होता. त्याचे नाव योगेश पाटील आहे याबाबत त्यांना खात्री नाही.
आठ दिवसांपूर्वी त्या शिवानी हिचेकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. मंगळवारी (२६ जानेवारी) पुण्यात शैक्षणिक काम असल्याने व खरेदी करावयाची असल्याने त्या सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे पोहोचल्या. काम झाले नाही म्हणून त्या पुन्हा मुंबई येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन येथे आल्या. त्या वेळी त्यांना योगेश पाटील याचा मोबाईल आला व आपण भेटू म्हणाला. काही वेळाने तो त्याची पांढऱ्या रंगाची कार (मॉडेल व नंबर माहीत नाही) घेऊन आला. दोघांचे बोलणे झाल्यानंतर त्याने मला पण मुंबईला जायचे आहे, जेजुरी येथे काम आहे. ते झाले की मी तुम्हांला मुंबई येथे सोडतो, असा आग्रह केल्याने त्या कारमध्ये बसल्या.
सासवड येथे पोहोचल्यानंतर जवळकर यांनी योगेश पाटील याला मला उशीर होत आहे मला पुन्हा पुणे येथे सोडा, असे सांगितल्याने त्याने कार वळवली. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते दिवे घाट उतरुन खाली सह्याद्री रेस्टॉरंट येथे आले. त्या वेळी पाटील याने त्यांना एक मॅडम येणार आहेत, मला सही करायची आहे. तुम्ही खाली उतरुन त्यांचेकडून पेपर घेऊन या, असे सांगितले. जवळकर हॅन्डबॅग घेऊन कारमधून खाली उतरू लागल्या. त्या वेळी तो त्यांना बॅग कारमध्येच ठेवा असे म्हणाल्याने त्यांनी बॅग कारमध्येच ठेवून मॅडम कोठे आहेत हे पाहत असताना मागे वळून पाहिले असता पाटील हा त्याची कार घेऊन निघून गेला. त्यानंतर सुरेखा जवळकर यांनी उरूळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन बॅगमध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोख, २० हजार रूपये किमतीची पुष्कराज खडा असलेली अर्धा तोळा वजनाची एक सोन्याची अंगठी व २० हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच ओरिजनल पॅनकार्ड, आयकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, एटीएम, आधारकार्ड, झेरॉक्स, मतदानकार्ड असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करुन नेला असल्याची फिर्याद दिली.