पुणे : शांती, धैर्य, संयम, आत्मविश्वास, बौद्धिक क्षमता आणि नावीन्याचे विचार ही भारतीय युवा पिढीची ताकद आहे. नवीन युवा पिढी बौद्धिक व आध्यात्मिक क्षमतेच्या जोरावर विकसित देशांवर राज्य करू शकेल. तंत्रज्ञान, पर्यावरण आदी संकटांमध्येही भारतीयांनी ठामपणे सामना केला आहे. भारत देशाची शक्ती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. यातूनच भारतीय युवा पिढी सक्षम बनलेली आहे. भविष्यात त्यांच्यासमोर जशी आव्हाने आहेत तशाच संधी देखील उपलब्ध असल्याचा आशावाद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २६ व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी ६ हजार ८१५ स्नातकांना पदवी, तर ७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. प्रत्येक विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ४२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.बिर्ला म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून समानता आणि बंधुत्वाचा भाव जागृत होतो. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण मिळू न शकणाऱ्या खेड्यापाड्यांतील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षित करून राज्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, या हेतूने भारती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले आहे.कुलगुरू डॉ. सावजी म्हणाले, भारती विद्यापीठाने गेल्या ६० वर्षांत देशाच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. विद्यापीठाने नेहमीच संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संशोधनात्मक कार्यासाठी विविध संस्थांकडून विद्यापीठाला १५ कोटींपेक्षा अधिक अनुदान प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनात्मक कार्यासाठी अडीच कोटींपेक्षा अधिक रुपये गेल्या वर्षात खर्च केले आहेत. गेल्या पाच वर्षांत १८ स्टार्टअप कार्यरत झाले असून यावर्षी तीन स्टार्टअप कार्यान्वित केले आहेत.
बौद्धिक क्षमतेच्या जोरावर युवापिढी जगावर राज्य करेल : ओम बिर्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:54 IST