पुणे: माझा मुलगा बारावी उत्तीर्ण झाला... माझी मुलगी अमुक टक्के घेत उत्तीर्ण झाली... आता पुढे काय करायचं? हा पालकांचा प्रश्न... तर दुसरीकडे ‘मित्र अमूक अमूक महाविद्यालयात या शाखेत प्रवेश घेत आहे. मीदेखील तेथेच प्रवेश घेऊ, की दुसरा पर्याय निवडू?’ हा विद्यार्थ्यांचा प्रश्न... यावर करिअर समुपदेश म्हणतात, सर्वप्रथम मिळालेले गुण आणि त्यानुसार उपलब्ध असलेले पर्याय समाेर ठेवा. मग पाल्यांची आवड कशात आहे, ते त्याला आणि आर्थिकदृष्ट्या पालकांनाही झेपतं का, याचा विचार करा. पर्याय खूप आहेत; पण काेणताही पर्याय निवडताना आपली आवड कशात आहे, ते जाणून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आवड, आर्थिक स्थिती, भविष्यातील संधी आदींचा विचार करून पर्याय निवडावे, असे आवाहन समुपदेशक विवेक वेलणकर यांनी केले आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोलकर म्हणाले की, बारावीची परीक्षा हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असला तरी या परीक्षेचा निकाल म्हणजे आपले सगळे आयुष्य नाही. त्यामुळे यात ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी निराश न होता करिअरच्या अन्य पर्यायांचा विचार करावा. एखादी गाेष्ट मनातून केली तर त्यात यश निश्चित मिळते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पर्याय निवडले पाहिजेत.
करिअर समुपदेशक डाॅ. दीपक शिकारपूर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धाेरणामुळे परिस्थिती बदलली आहे. आता विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक वाटा उपलब्ध झाल्या आहेत. बारावीत कमी मार्क पडले तरी ‘सीईटी’चा पर्याय आहे. चांगले मार्क पडले त्यांचे कौतुकच आहे, पण कमी मार्क पडले म्हणून खचून जाण्याचे कारण नाही. मिळालेले मार्क, आवड आणि आर्थिक स्थिती यानुसार पर्यायांचा विचार करा आणि पुढे जा. झेप घेण्यासाठी अकाश खुले आहे.
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. अमर शिंदे म्हणाले की, पालक आणि विद्यार्थी दोघांनीही सर्वप्रथम हाती आलेला निकाल शांतपणे स्वीकारला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले म्हणून करिअर संपले, असे होत नाही. जास्त मार्क पडले म्हणजे सर्व जग खुलं झालं, असंही नाही. अपेक्षेविरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद साधा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या. मग शांतपणे पुढील करिअर निवडण्यासाठी पर्याय काय काय उपलब्ध आहेत आणि आवड कशात आहे, याचा सारासार विचार करून पर्याय निवडा.
बारावीनंतर मेडिकल, अभियांत्रिकी यासह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. खास करून कमीत कमी पैशात आणि तातडीने राेजगार उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी-होक). सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा कोर्स उपलब्ध आहे. रिटेल मॅनेजमेंटअंतर्गत सुरू असलेल्या या अभ्यासक्रमाचे सूत्र ४० टक्के थेअरी आणि ६० टक्के प्रात्यक्षिक असे आहे. रेफ्रिजरेशन, एअरकंडिशन हे क्षेत्र असाे अथवा ‘एमकेसीएल’ने सुरू केलेला इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा कोर्स. झटपट करिअरसाठी हा चांगला पर्याय आहे. यात शिकत असतानाच कंपनीत काम करण्याची संधी मिळते, स्टायफंड मिळताे आणि मुक्त विद्यापीठाची पदवीदेखील मिळते. चांगले काम केल्यास कायमस्वरूपी नोकरीदेखील मिळते. - विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक