पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चालली आहे. हे तास कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये. लक्ष्मी रस्त्याने आठ गणपती मंडळांना जाऊ द्यावे. शहर वाढले असेल, तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत, याकडे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी, अशी मागणी देखील पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांनी सोमवारी केली. याबाबत मानाच्या गणपती मंडळांशी संवाद साधण्यात येणार असून, मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.
गणेशोत्सवाला सुरु होण्यापूर्वीच विसर्जन मिरवणुकीच्या वादाला काहीसे तोंड फुटले आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीची सुरुवात सकाळी ७ वाजताच करावी, या आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रशासनासमोर नवा पेच निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस निमंत्रक संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, गरुड गणपती मंडळाचे सुनील कुंजीर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, उदय महाले, नरेंद्र व्यवहारे, मनीष साळुंके, अजय दराडे, विनायक धारणे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय झाला, तर आम्ही एका पथकासह सहभागी होण्यास तयार आहोत, असे बाल विकास मंडळाचे कार्याध्यक्ष कुणाल गिरमकर यांनी सांगितले. खड्डे बुजविणे, विद्युत दिवे ही कामे करण्यासाठी महापालिका आहे. त्यासाठी राज्य उत्सव निधीतून पैसे खर्च करू नयेत. ठेकेदार आणि दलाल पोसले गेले, तर त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. अनुदान मंडळ कार्यकर्त्यांच्या पदरात कसे पडेल, हे पाहिले पाहिजे असे माळवदकर म्हणाले.
‘वाद न होता मार्ग काढायचा आहे. ज्या आवाजातून अनेकांना बहिरेपणा येऊ शकतो, असे प्लाझ्मा स्पीकर लावता कामा नये, अशा अपेक्षा व्यक्त करून शिरीष मोहिते यांनी ‘मानाच्या गणपती मंडळांना पथकांची आणि वेळेची मर्यादा घालून दिली पाहिजे,’ अशी मागणी केली.
श्याम मानकर म्हणाले, ‘विसर्जन मिरवणुकीमुळे मंडळे बदनाम झाली आहेत. लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या तीनशेपैकी आठ मंडळांनी दहा तास घेतले, हा अभ्यास प्रशासनापुढे मांडला पाहिजे. लक्ष्मी रस्त्यावर वादन करण्यासाठी ढोल ताशा पथके बिदागी घेत नाहीत. अन्य मंडळांना भरभक्कम बिदागी द्यावी लागते.’काकडे म्हणाले, ‘डीजे वाजवणाऱ्या मंडळांबरोबर आम्ही नाही. गणेशोत्सवात राजकारण येता कामा नये.
महापौर हे गणेशोत्सवाचे निमंत्रक असतात. पण, निवडणुका न झाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शहराला महापौर नाहीत. हे ध्यानात घेऊन मंडळांनी सहभाग घेत महापालिका आणि पोलीस प्रशासनाशी संवाद वाढविण्याचे ठरविले आहे. - रवींद्र माळवदकर, अध्यक्ष, साखळीपीर तालीम मंडळ
मंडळांचे म्हणणे काय?
१) नेते मंडळींना दर्शनासाठी दुपारी बोलवावे. ते संध्याकाळी आले तर कोंडी आणि रस्ते बंद करण्याचा नागरिकांना त्रास होतो.2) मानाच्या गणपती समोरील ढोल पथकांची संख्या मर्यादित करणे जेणे करुन पथके जास्त वेळ लावणार नाहीत.3) मानाच्या गणपती प्रमाणे इतर मंडळांनाही न्याय मिळायला हवा.4) मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी.