पुणे : कुटुंबातील एकमेव कमावता व आधीच वडिल गमावलेल्या कर्वेनगर येथील तरूणाला आईने स्वत:ची एक किडनी देऊन पुनर्जन्म दिला. दोन्ही किडन्या खराब झाल्याने नोव्हेंबर २०१७ पासून डायलिसिसवर असलेल्या तरूणावर ससून रूग्णालयात गुरुवारी (दि.१५) किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करण्यात आली. ही ससून रुग्णालयातील ३३ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.
एका ऑफसेटच्या दुकानात बाईडर म्हणून काम करणाऱ्या ३७ वर्षीय तरूणाला नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे व किडनी प्रत्यारोपण गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर लगेच त्याचे डायलिसिस सुरु केले. डॉक्टरांनी सल्ला दिल्यानुसार रुग्णाच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात प्रत्यारोपणा बाबत चौकशी केली असता प्रत्यारोपणासाठी १५ लाखाच्या आसपास खर्च सांगण्यात आला. अत्यंत गरिब आर्थिक परिस्थिती व रूग्ण एकमेव कुटुंबातील कमावता असल्याने व जवळ काहीच पैसे नसल्याने हतबल कुटुंबाने किडनी प्रत्यारोपण करण्याचा विचार सोडून फक्त डायलिसिस सुरु ठेवले. डायलिसिस मुळे ऑफसेटमध्ये काम करणे शक्य नसल्याने जुलै २०२३ पासून काम बंद झाले आणि उत्पन्नही थांबले गेले. ससूनमधील सवलतीच्या उपचाराबाबत विचारणा करणाऱ्या नातेवाईकांना समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे यांनी खर्चबाबत माहिती देऊन संस्था व योजनांमधून आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन केले. रुग्णाच्या कुटुंबाची माहिती घेऊन आई व दोन बहिणींना किडनीदान करण्याबाबत समुपदेशन केले आणि आई व दोन्ही बहिणी किडनीदान करण्यास तयार झाल्या. त्यानुसार किडनीरोग तज्ञ् डॉ. संदीप मोरखंडिकर यांच्या सल्ल्यानुसार आईची किडनी घेण्याचे निश्चित करण्यात आले. विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीने प्रत्यारोपन करण्यास मान्यता दिल्यानंतर गुरुवारी (दि.१५) तरूणावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, अवयव प्रत्यारोपण प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव व शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. लता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली किडनीरोग तज्ञ् डॉ. संदीप मोरखंडिकर, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.निरंजन आंबेकर व युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, वास्कुलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, डॉ. हृषीकेश पारशी व डॉ.विशाल सावकार, भूल विभाग प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षिरसागर सहारी, प्रत्यारोपण ऑपेरेशन थिएटरच्या प्रमुख सिस्टर राजश्री कानडे व परिचारीकांचा सहभाग होता.