पुणे: गणेश पेठेत दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. आवेज अश्पाक शेख (वय २२, रा. गणेश पेठ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
आवेज शेख हा त्याच्या साथीदारासह काेंढवा व गणेश पेठ परिसरात अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशी घातक शस्त्रासह खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे असे गुन्हे केले आहेत. मागील २ वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाही. समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करुन पोलिस आयुक्तांकडे पाठविला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याची पडताळणी करुन आवेज शेख याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ८६ अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.