पुणे : राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत चाळीशी पार गेला. कमाल सरासरी तापमानात किमान १ ते ४ अंशांची वाढ दिसून आली. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत तापमानात फारसा फरक पडणार नसून त्यानंतरच्या चार दिवसांत मात्र, तापमानात २ ते ४ अंशाची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरातही मंगळवारी (दि. ८) लोहगाव येथे सर्वाधिक ४२.७ अंश तापमान नोंदविण्यात आले.
उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरयाना राज्यात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे येत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत तापमान चाळीस अंशांपुढे नोंदविण्यात आले. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्याखालोखाल जळगाव येथे तापमाना ४३.३ अंश सेल्सिअस इतके होते. तर किमान तापमानातही सुमारे १ ते ४ अंशांची वाढ झाल्याने रात्री उकाडा जाणवत आहे. राज्यात सर्वात जास्त किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस सोलापूर येथे नोंदविण्यात आले तर सर्वात कमी किमान तापमान १९.६ अंश अहिल्यानगर येथे नोंदविण्यात आले. कमाल तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरांत रस्त्यांवरील वाहतूक तुलनेने कमी झाली आहे. पुणे शहरातही मंगळवारी सर्वाधिक तापमान लोहगाव येथे ४२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. कोरेगाव पार्क येथे ४१.४ आणि शिवाजीनगर येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
जळगाव ४३.३कोल्हापूर ३८.७
महाबळेश्वर ३३.७मालेगाव ४२.६
नाशिक ४१सांगली ३९.६
सातारा ४०.३सोलापूर ४१.८
मुंबई ३४.१सांताक्रुझ ३४.६
अलिबाग ३५.६रत्नागिरी ३३
धाराशिव ४०.२संभाजीनगर ४१.६
परभणी ४१.३अकोला ४४.१
अमरावती ४३बुलढाणा ४०.६
चंद्रपूर ४२.६गोंदिया ३९.२
नागपूर ४०.८वाशिम ४२
वर्धा ४०.६यवतमाळ ४१.२
पुणे शहरातील तापमान
शिवाजीनगर ४१.३पाषणा ४०.६
लोहगाव ४२.७चिंचवड ४०.३
लवळे ३९.४मगरपट्टा ३९.६
कोरेगाव पार्क ४१.४एनडीए ३९.५
हडपसर ४०.७