- उमेश गो. जाधवपुणे : १९ वर्षांखालील गटात दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकल्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. आता भारताच्या वरिष्ठ संघाकडून विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न आहे, असा निर्धार भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाची कर्णधार निकी प्रसाद हिने व्यक्त केला.डब्ल्यूपीएलमधील दिल्ली संघाच्या सराव शिबिरात दाखल होण्यासाठी पुण्यात दाखल झालेली निकी म्हणाली की, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आम्ही दहा महिने आधीच एक संघ म्हणून एकत्र आलो होतो. देशभरातील वेगवेगळ्या संघांकडून खेळून आम्ही भारतीय संघाच्या शिबिरात दाखल झालो होतो. चॅलेंजर चषकानंतर एक सराव शिबिर झाले होते. आशिया चषकाआधी झालेल्या या शिबिरानंतर एक तिरंगी मालिकाही खेळविण्यात आली. त्यानंतर आशिया चषकासाठी निवड झाली आणि आम्ही आशिया चषकात वर्चस्व गाजवत स्पर्धा जिंकली आणि विश्वचषकाचा प्रवास सुरू झाला.विश्वचषकात आम्ही केवळ आमचा खेळ दाखविण्याचा प्रयत्न केला असे सांगून निकी म्हणाली की, विश्वचषक जिंकण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. संघातील आम्ही सर्व खेळाडूंसाठी अतिशय अभिमानास्पद क्षण होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आम्हाला देशभरातून खूप पाठिंबा मिळत होता. प्रत्येक विजय समाजमाध्यमांवर झळकत होता. आम्हा युवा खेळाडूंना यामुळे खूप प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली.अनेक मुलींना मिळाली प्रेरणानिकी म्हणाली की, कर्नाटकमधील शाळेत सुरुवातीला क्रिकेट खेळणारी कोण ही मुलगी असे माझ्याकडे पाहिले गेले. पण आता अनेक मुली क्रिकेट खेळत आहेत. त्यांना प्रेरणा देऊ शकले याचा आनंद आहे. आई माझी मार्गदर्शकविश्वचषकादरम्यान जेमिमा राॅड्रिग्ज हिच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडू कौतुक करत होते. त्यामुळे प्रत्येक सामन्यात आमचा आत्मविश्वास वाढत होता. त्याचबरोबर घरात आई नेहमीच मार्गदर्शन करत असते. प्रत्येक लहान गोष्टीत तिच्याकडून मला ती सूचना करत असते. विश्वचषक जिंकल्यानंतर तिला आनंद झाला, पण त्यानंतरही तिने सूचना करणे बंद केले नाही, असेही निकी म्हणाली.
भारताच्या वरिष्ठ संघाकडून विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 19:10 IST