पुणे : अहिल्यानगर (अहमदनगर) येथील चौंडी या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी २९ एप्रिलला होणार असणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या खर्चावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व आम आदमी पार्टी (आप) यांनी टीका केली आहे. भव्य अशा शामियान्यासह तब्बल १ कोटी ५ ० लाख रूपयांचा खर्च या बैठकीवर करण्यात येणार असून त्याच्या निविदाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सुनील माने यांनी या खर्चावर टीका करतानाच लाडक्या बहिणींना अपात्र करत सुटलेल्या सरकारला लक्ष्य केले आहे. निवडणुकीआधी १ कोटी २९ लाख महिलांना ४ महिन्यांचे प्रत्येकी १५०० रूपये आधीच दिले. त्यावेळी जाहीरनाम्यात २१०० रूपये करणार असल्याचे आश्वासन दिले.
आता निवडणूक झाली, सत्ता मिळाली त्यानंतर लगेचच किमान ७ ते ८ लाख लाडक्या बहिणींना अपात्र घोषित केले. १५०० रूपयांचे २१०० रूपये करणे दूरच पण १५०० रूपयांचेच ५०० रूपये केले. अद्याप काही लाख लाडक्या बहिणींचे अर्ज निर्णयाविना प्रलंबित आहेत. सरकार म्हणते पैसे नाहीत, योजना चालवायची कशी व इकडे केवळ प्रतिकात्मक बैठकीसाठी म्हणून अख्खे मंत्रीमंडळ चौंडीला चालले आहेत, तिथे आलिशान अशा भव्य शामियान्यापासून ते स्टेज, खुर्च्या, माईक अशा निव्वळ सजावटीवर १ कोटी ५ ० लाख खर्च केले जातात, सरकारला याचे काहीही वाटत नाही, कारण ते निगरगट्ट झाले आहे अशी टीका माने यांनी केली. लाडका भाऊ योजना कुठे आहे? बेरोजगार युवकांना स्टायपेंडचे काय झाले? कंत्राटदारांनी कामे केली त्याचे ९० हजार कोटी थकवले. पैसे नाहीत म्हणून शाळा बंद करण्याची जणू योजनाच सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्याा स्काॅलरशीपला पैसे नाहीत पण अशा बैठकीसाठी १ कोटी ५ ० लाख रूपये उधळणाऱ्या सरकारचा निषेध करत असल्याचे माने यांनी म्हटले आहे.आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनीही या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. मध्यप्रदेश सरकारने ही अहिल्यादेवी जयंती निमित्त इंदूर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती त्याच धर्तीवर चोंडीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
केवळ प्रसिद्धीसाठी आणि दिखाऊ अस्मितांच्या सहाय्याने बहुजन समाजाची भलावण करण्यासाठी दीड कोटीचा खर्च केला जाणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. कंत्राटदार, लाडकी बहीण, शाळा, एसटी कामगार, शिष्यवृत्तीचे विद्यार्थी, शाळा परिपूर्ती या सगळ्यांचे काहीशे कोटी रूपयांचे देणे सरकारने द्यायचे राहिलेले आहे. असे असताना हा खर्च म्हणजे कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रकार आहे असल्याची टीका किर्दत यांनी केली आहे.