आळेफाटा - अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे धरण १८ कोटींत होणार होते, परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने सहा हजार कोटी अंतिम कामाला लागले. तीन पिढ्या खपल्या तेव्हा हे काम पूर्ण झाले. राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की, ते वेळेत पूर्ण झाले नाहीत. तीन पिढ्या खपल्या तेव्हा हे काम पूर्ण झाले. यापुढे हे टाळायला हवं अशी खंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करत पुढील काळात सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जुन्नर तालुक्यातील चिलेवाडी या मध्यम प्रकल्पाच्या धरणातून तालुक्याच्या पूर्व भागातील १९ गावांसाठी बंदिस्त नलिकेद्वारे ३९ किलोमीटर लांबीची पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेपैकी २८ किलोमीटर योजनेचे पाणीपूजन सोमवारी (दि. १२) राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोळवाडीत झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशा बुचके, प्रसन्न डोके, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, उद्योजक सचिन वाळुंज, माजी सरपंच प्रदीप देवकर, माजी सरपंच दिनेश सहाणे, आदी मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी वरदान ठरलेले चिल्हेवाडी बंदिस्त पाइपलाइन काम अंतिम टप्प्यात असून, या कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. २८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित ११ किलोमीटर काम लवकर पूर्ण होणार आहे. चाऱ्यामधून पाणी देऊ लागलो तर पाणी कोणालाच मिळणार नाही. भविष्य काळामध्ये बंद नलिकेतून पाणी देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यामुळे तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होते. यामुळे अधिक क्षेत्र पाण्याखाली येईल. जुन्नर तालुक्यात बंद पाइपमधून पाणी नेण्याचा प्रयोग अजून दोन-तीन ठिकाणी करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी याला संमती दिली तर भविष्यकाळामध्ये सगळीकडेच असा प्रयोग करता येईल. कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अष्टविनायकांपैकी ओझर येथे नौका नयन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊ, पूर्व भाग सुजलाम होणार चिल्हेवाडी हे मध्यम प्रकल्पाचे धरण असून, या धरणाची साठवण क्षमता एक टीएमसी एवढी आहे. या धरणाचे काम २००० मध्ये पूर्ण झाले असून, बंद पाइपलाइन कामासाठी पहिल्यांदा २०१० मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर हे काम अंतिम टप्प्यात असून, तालुक्यातील पूर्व भागातील चिल्हेवाडी, पाचघरवाडी, आंबेगव्हान, रोहकडी, ओतुर, डुंबरवाडी, खामुंडी, गायमुखवाडी, पिपरी पेंढार, वडगाव आनंद, जांभुळपट, नवलेवाडी, आळेफाटा, आळे, कोळवाडी, लवणवाडी, राजुरी, गुंजाळ वाडी, बेल्हे, बांगरवाडी या २१ गावांना बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात येणार असून, पूर्व भागातील ७ हजार ६९७ हेक्टरमधील जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. जुन्नर पूर्व भाग सुजलाम, सुफलाम होणार असल्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले.