Pune Crime: विमाननगर परिसरात दहशत माजविणारा सराईत गुंड स्थानबद्ध
By विवेक भुसे | Updated: July 8, 2023 15:48 IST2023-07-08T15:48:28+5:302023-07-08T15:48:58+5:30
एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत...

Pune Crime: विमाननगर परिसरात दहशत माजविणारा सराईत गुंड स्थानबद्ध
पुणे : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुंडावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजय पार्क झोपडपट्टी, न्यू एअरपोर्ट रोड, विमाननगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.
ऋतिक अवधूत हा सराईत गुन्हेगार असून लोखंडी रॉड, धारदार हत्याराने गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत. गेल्या ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिक त्याच्याविरुद्ध उघड तक्रार करण्यास धजावत नव्हते. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे व पी सीबी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला़ त्याची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत २६ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.