पुणे : बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तेथील कॉलेज बाहेरील रोडवर तरुणाला कोयत्याने मारहाण करणाऱ्या टोळीला कोंढवापोलिसांनी जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्र व वाहने असा ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.
भावेश बाळासाहेब कुंजीर (२३, रा. सासवड), अथर्व कैलास पवार (२१, रा. बी टी कवडे रोड, दळवीनगर, घोरपडी), सूरज सचिन राऊत (२१, रा. सासवड- बोपदेव घाट रोड, येवलेवाडी), आर्यन विलास पवार (१८, रा. ओम सोसायटी, दळवीनगर, घोरपडी), सौरभ प्रदीप लोंढे (१८, रा. संदेश सहकारी सोसायटी, संभाजीनगर, धनकवडी, मुळ रा. सातेफळ, ता. कळंब, जि. धाराशिव), राज दिगंबर रोंगे (१९, रा. सिंगापूर होम्स, येवलेवाडी), आणि वरुण बबन भोसले (२१, रा. आनंदनगर, जेजुरी ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ट्रिनिटी कॉलेजसमोरील रोडवर १६ जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास विश्वजित बाबाजी हुलवळे (१९, रा. येवलेवाडी) याला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले होते. त्यावरून कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना १८ जानेवारी रोजी पोलिस कर्मचारी सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे याच्या येवलेवाडी येथील सिंगापूर होम्स येथे लपले आहेत. पोलिसांनी तातडीने तेथे जात घरावर छापा टाकून सातही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख, सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सागर भोसले, सुजित मदन, राहुल थोरात यांच्या पथकाने केली.