टेमघरचे कार्यकारी अभियंतापद रिक्त
By Admin | Updated: January 28, 2017 01:13 IST2017-01-28T01:13:23+5:302017-01-28T01:13:23+5:30
धोकादायक पद्धतीने होत असलेल्या गळतीमुळे सध्या चर्चेत असलेल्या टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंतापद सात महिन्यांपासून रिक्त

टेमघरचे कार्यकारी अभियंतापद रिक्त
पुणे : धोकादायक पद्धतीने होत असलेल्या गळतीमुळे सध्या चर्चेत असलेल्या टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंतापद सात महिन्यांपासून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर, धरणदुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही सरकारदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाल्याने पूर्णवेळ अभियंत्याची गरज आणखीच अधोरेखित होत आहे.
राज्य सरकार गेली २ वर्षे दुष्काळात होरपळले होते. जिल्ह्यालादेखील त्याची मोठी झळ बसली होती. पुणे शहराला खडकवासला प्रकल्प साखळीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याअभावी गेल्या उन्हाळ्यात पाण्याचे रेशनिंग करण्याची वेळ आली होती. खडकवासला प्रकल्प साखळीतील पावणेचार टीएमसी क्षमतेचे टेमघर हे महत्त्वाचे धरण आहे. यंदा मॉन्सून चांगला झाल्याने प्रकल्प साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली. मात्र, पावसाळ्यातच टेमघरमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे समोर आले होते. अवघ्या १६ वर्षांपूर्वीचे हे धरण असल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणी चौफेर टीका झाल्याने धरणाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हादेखील दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या धरणाच्या दुरुस्तीसाठी त्यातील पाणीसाठादेखील निम्मा आला आहे. मात्र, अजूनही धरणदुरुस्तीच्या कामाला ना मंजुरी मिळाली, ना पूर्णवेळ सक्षम अधिकारी मिळाला आहे.