राज्याकडून पुण्याला ‘तेजस्विनी’
By Admin | Updated: March 19, 2016 02:50 IST2016-03-19T02:50:05+5:302016-03-19T02:50:05+5:30
मोठ्या शहरांमध्ये नोकरी तसेच इतर निमित्ताने मोठ्या प्रमाणात बसप्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बस देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी २0१६-१७ च्या

राज्याकडून पुण्याला ‘तेजस्विनी’
पुणे : मोठ्या शहरांमध्ये नोकरी तसेच इतर निमित्ताने मोठ्या प्रमाणात बसप्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बस देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी २0१६-१७ च्या राज्याच्या अंदाजपत्रकात केली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर या शहरांमध्ये या बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बसची संख्या कमी असल्याने गर्दीत अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करणाऱ्या महिलांना या योजनेमुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याने या घोषणेचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले आहे.
प्रामुख्याने नोकरी तसेच शिक्षणासाठी बसप्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिला प्रवाशांना दिलासा देण्यासाठी २0१६-१७ च्या अंदाजपत्रकात महिलांना बसप्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक प्राधिकरणामार्फत ३00 बस उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी तब्बल ५0 कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच शहरांना समान बस दिल्यास पुणे शहरास महिलांसाठी तब्बल ६0 बस उपलब्ध होणार आहे.
अनेकदा गर्दीमुळे बसमध्ये मोठी कुचंबणा होते. अनेकदा गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केली जाते, तर कधी कधी चोऱ्यांचादेखील सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांची चांगली सोय होणार आहे. भविष्यातही बसची संख्या आणखी वाढविणे गरजेचे आहे.
-नीता भंडवलकर (बस प्रवासी)
बसमध्ये महिलांसाठी आरक्षणाची जागा असूनही त्यावर जागा मिळत नाही. त्यामुळे महिलांसाठी गर्दीच्या वेळी स्वतंत्र बस असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे नवीन बस मिळणार असल्याने त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
- निशा शिंदे (बस प्रवासी)