रेल्वेस्थानकांवर ‘तेजस’ पथकाची नजर

By Admin | Updated: February 11, 2016 03:07 IST2016-02-11T03:07:15+5:302016-02-11T03:07:15+5:30

खडकी ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांवर अस्वच्छता पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ‘तेजस’ पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे

'Tejas' squad's watch on railway stations | रेल्वेस्थानकांवर ‘तेजस’ पथकाची नजर

रेल्वेस्थानकांवर ‘तेजस’ पथकाची नजर

पिंपरी : खडकी ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांवर अस्वच्छता पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ‘तेजस’ पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे स्थानकासाठी हे पथक तैनात केले होते. या पथकाने चांगली कामगिरी केली. त्यांना आलेले यश लक्षात घेऊन खडकी ते लोणावळ्यादरम्यान आणखी एक पथक तैनात करण्यात आले.
विनातिकीट प्रवास व स्थानकाच्या परिसरात अवैधरीत्या वाहने लावणाऱ्यांबरोबरच आता स्थानकाच्या परिसरात धूम्रपान करणारे व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेचा वाणिज्यीक विभाग व रेल्वे सुरक्षा दलाचा सहभाग असलेल्या तेजस पथकाची मागील महिन्यात पुण्यात स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडून जोरदार करण्यास सुरुवात करण्यात आली. या पथकाने ९ ते ३१ जानेवारी या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये पुणे विभागात स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५१७ जणांना पकडण्यात आले. विनातिकीट प्रवास करणारे ४७२, अवैधरीत्या वाहने उभी करणारे १३५ व स्थानकावर धूम्रपान करणाऱ्या चार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. विविध कारणांस्तव ११२८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारीपासून खडकी ते लोणावळादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या, अस्वच्छता पसरविणाऱ्या, तसेच धूम्रपान करणाऱ्यांवर तेजस पथकाने कारवाई केली. या पथकाने सुमारे ३० लोकांकडून ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. व्यवस्थापक बी. के . दादाभोय, गौरव झा यांच्या मार्गदर्शनाखाली संजयकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

विनातिकीट प्रवासी संकटात
खडकी ते लोणावळादरम्यान
१४ रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानकांवर नेहमीच ठिकठिकाणी पडलेला कचरा, पान-गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या असे चित्र दिसत असते. मात्र, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तेजस पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनाही चाप बसणार आहे.

पुण्यात जानेवारी महिन्यात रेल्वेच्या वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त तेजस पथक तैनात केले. या पथकाला आलेल्या यशामुळे अजून एक पथक तयार केले. खडकीच्या पुढील भागातील रेल्वेस्थानकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाईल. सात जणांचा सहभाग असलेले हे पथक आहे.
- डी. विकास, विभागीय आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

Web Title: 'Tejas' squad's watch on railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.