अपघातात डॉक्टरसह शिक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 11, 2017 03:45 IST2017-06-11T03:45:53+5:302017-06-11T03:45:53+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १.३० वाजता पोंधवडी गावच्या हद्दीत बिल्ट पेपर कंपनीसमोर मोटार आणि ट्रकचा अपघात

Teacher's death with doctor in an accident | अपघातात डॉक्टरसह शिक्षकाचा मृत्यू

अपघातात डॉक्टरसह शिक्षकाचा मृत्यू

- लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १.३० वाजता पोंधवडी गावच्या हद्दीत बिल्ट पेपर कंपनीसमोर मोटार आणि ट्रकचा अपघात झाला. या घटनेत इंदापूर येथील एक डॉक्टर आणि एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. त्याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. या अपघातात इंदापूर येथील डॉ. अरुण रामचंद्र शिंदे (वय ४२), तसेच शिक्षक बाळासाहेब अशोक माने (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील पासपोर्ट आॅफिसमधील काम उरकून डॉ. शिंदे आणि शिक्षक माने त्यांच्या स्विफ्ट मोटारीने (एमएच ४२ एच ४१६७) भिगवणहून इंदापूरकडे जात होते. या वेळी बिल्ट कंपनीसमोर लोखंडी पाइप घेऊन जाणाऱ्या ट्रकला (एमएच १२ एचडी २९६९) त्यांची मोटार पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातांची मालिका सुरूच
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका वाढत आहे. याकडे महामार्ग पोलीस तसेच आरटीओ प्रशासन लक्ष देताना दिसून येत नाही. काही आर्थिक तडजोडींमुळे धोकादायकरीतीने माल भरलेली वाहने बिनदिक्कतपणे वाहतूक करताना दिसून येतात. तसेच जास्तीचा लोड घेऊन वाळूवाहतूक करणारी वाहने सर्रास आढळून येत असली तरी यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या निष्पाप नागरिकांचा यामुळे जीव जात आहे. हा अपघात हे त्याचेच उदाहरण असून पुण्याहून लोखंडी पाइप घेऊन निघालेला या ट्रकवर कारवाई झाली असती तर डॉक्टर आणि शिक्षकाचा जीव यातून नक्कीच वाचला असता.

Web Title: Teacher's death with doctor in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.