शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी!
By Admin | Updated: May 26, 2016 03:36 IST2016-05-26T03:36:40+5:302016-05-26T03:36:40+5:30
आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी!
पुणे : आयएसओ शाळा ही चळवळ पुढे त्याच गतीने चालू ठेवून गुणवत्तावाढीसाठी भविष्यात शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा मानस बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
देसाई यांनी पदभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा पत्रकारांशी बोलत होते.
देसाई म्हणाले, ‘‘आयएसओमुळे शाळांमध्ये बदल होत आहे. यात लोकसहभाग मिळत असल्याने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा बदलत असून, भौतिक सुधारणाही होत आहेत. गुणवत्तावाढ होत असून पटसंख्या वाढत आहे. यात शिक्षकांचे योगदान आहेच; मात्र आता जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा बघाण्याचा दृष्टिकोनही बदलत असून, त्यांच्या अपेक्षांना पुरेपूर उतरण्यासाठी सिस्टीममध्ये थोडा बदल आवश्यक आहे.’’
याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा विचार आहे. शिक्षक कामावर असूनही गैरहजर असतात, अशा तक्रारी येतात. यावर उपाय
म्हणून ही पद्धत लागू
करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे, ही हजेरी फक्त केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे.
वेबसाईटवर आपल्या शाळेतील शिक्षक आज शाळेवर होता की नाही, तो किती वेळ शाळेत होता, हे सर्वांनाच पाहता येईल. यातूनही शिक्षक मार्ग काढू शकतात; मात्र वारंवार दांडी मारणाऱ्या शिक्षकांच्या पगारावरही गदा येऊ शकते, याचाही प्लॅन करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)
विद्यार्थिहित महत्त्वाचे
1)सध्या शिक्षकांच्या समानीकरणावरून पेच सुरू आहे. समानीकरणाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. याविषयी देसाई म्हणाले, ‘‘शेवटी विद्यार्थ्यांचे हित सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. काही तालुक्यांत रिक्त जागांचे प्रमाण खूप आहे.
2)एक किंवा दोन शिक्षकी शाळांमध्ये तेथील शिक्षक रजेवर गल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रिक्त जागांना प्राधान्य दिले जाणार आहे.’’ शिक्षक संघटनांनीही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
रोस्टरनंतर अनुशेष भरणार...
सध्या रोस्टर तपासणी सुरू आहे. एका महिनाभरात रोस्टर पूर्र्ण होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर अनुशेष किती आहे, यावर भरती करण्याचे ठरविण्यात येईल.
रुजू न होणाऱ्या शिक्षकांना नोटीस
आपापसातील बदलीने इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आलेल्या, मात्र त्या जागेवर रुजू न झालेल्या शिक्षकांना नोटीस काढणार असून ते रुजू न झाल्यास परत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवू, असे यापुढे धोरणच ठरविणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
गेल्या ६ महिन्यांत इतर जिल्ह्यांतून आपल्याकडे आपापसातील बदलीतून आलेल्या शिक्षकांपैैकी ३० शिक्षक अद्याप त्यांच्या जागेवर रुजू झाले नाहीत. हे शिक्षक सुरुवातीला अटी व नियम मान्य करून सोयीने येतात. नंतर पुन्हा आपल्या सोयीच्या जागेनुसार अंशत: बदलासाठी फिरत बसतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे अशा शिक्षकांबाबत धोरण म्हणून निर्णय घेतला जाणार असून जे त्यांना मिळालेल्या जागेवर रुजू होणार नाहीत, त्यांना आम्ही सेवेत दाखल करूनच घेणार नाही.