हौदात टँकरचे पाणी; यंदाही पाण्यासारखे पैसे खर्च होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:17 IST2025-02-16T15:12:40+5:302025-02-16T15:17:10+5:30
पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुःशृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध ७ ठिकाणी टँकर पॉइंट निश्चित

हौदात टँकरचे पाणी; यंदाही पाण्यासारखे पैसे खर्च होणार
- जानेवारी महिन्यात पुरविले ३९ हजार टँकर
पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टॅटँकरची मागणीही वाढत आहे. महापालिकेकडून नागरिकांना दिवसाला बाराशे ते दीड हजार टँकर पुरवले जात आहेत. महापालिकेच्या टैंकर पॉइंटवरून जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टैंकर पुरविण्यात आले आहेत. ही संख्या गतवर्षी जानेवारी महिन्यात पुरविलेल्या टँकरच्या तुलनेत ७ हजार ११२ ने जास्त आहे. याशिवाय खासगी टँकर पॉइंटवरील टँकरची संख्या वेगळीच आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुःशृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे.
महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. एका ठेकेदाराकडे कमीत कमी ८ टैंकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे. यंदा जानेवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात महापालिकेने ३२ हजार ५८० टैंकर पाणीपुरवठा केला होता. यंदा याच महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविले आहेत. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे.
टँकरधारकांकडून नागरिकांची अशा प्रकारे होते लूट
- महापालिकेचे सुमारे साडेपाचशे टैंकर असून, खासगी दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणपणे उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढते. यंदाही उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याच्या टँकरची संख्या वाढलेली आहे.
- महापालिकेच्या टैंकर पॉइंटवर ६६६ रुपये पास काढून भरलेला टैंकर किती पैशांत विक्री करावा, यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे एक टैंकर दीड ते दोन हजारांत विकला जातो. टँकर माफियांची लॉबी तयार झाली असून जनतेची लूट सुरू आहे.
चलनाद्वारेही पाण्याची सोय
महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टैंकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी पुरविण्याची सुविधा उपलब्ध होते.खासगी टैंकरधारकांना महापालिकेकडून एका टैंकरसाठी ६६६ रुपयांचा पास दिला जातो. ते पाणी त्या टँकरचालकाने किंवा मालकाने किती रुपयांना विकावे,यासंबंधी कसलेही बंधन नाही. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसह नव्याने समावेश झालेल्या २३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी सर्वाधिक आहे.
केशवनगर भागात महापालिकेचे पाणी दररोज येत नाही. त्यात पाणी येण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. अनेकवेळा घरातील लोक कामाला गेल्यानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येते, त्या दिवशी कोणाला तरी एकाला काम बुडवून घरी बसावे लागते.त्यातही कमी दाबाने वीस मिनिटे किंवा अर्धा तास पाणी येते. - मारुती शिंदे, केशवनगर
महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे सोसायटीसाठी अनेकवेळा बाहेरून पाण्याचा टँकर मागवावा लागतो, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे टैंकर माफियांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने आठशे, एक हजार, दीड हजार रुपये शुल्क आकारले जाते. पाण्याची गरज असते. त्यामुळे निमूटपणे पैसे द्यावे लागतात. - रहिवासी, धायरी