पुणे: राज्यात एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. मात्र राज ठाकरेंकडून याबाबत अजून कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये. तसेच मनसेचे नेते एकत्रीकरणाबाबत सकारात्मक नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. अशातच पुण्यातून महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) पुन्हा एकदा शहरात हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मनसे शिवसेना युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आता मनसे कार्यकर्त्यांकडूनही युती होणार नसल्याचे बोलले जात आहे.
मनसेच्या पुण्यातील शहर कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला असून, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे पुणे महापालिकेतील सर्वच जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे युती होणार नसल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. येत्या ९ जून रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार असून, त्या दिवशी ते सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे पुण्यातील संघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व शाखाप्रमुखांची बदल करण्यात येणार असून, गटप्रमुखांची नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. याशिवाय, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन पद निर्माण करून त्यावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पुण्यात सुरू असलेली ही बैठक मनसेच्या आगामी रणनीतीचं संकेत देणारी असून, पुणे महापालिकेत आपलं अस्तित्व ठसवण्यासाठी मनसे आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.