पुणे : बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सातत्याने काही ना काही तक्रारी सुरूच आहेत. आता ‘एसी’ चालत नसल्याची तक्रार कलाकारांनी केली. त्याची दखल घेऊन रंगमंदिरात नवीन ‘एसी’ बसविण्यात येत आहे. त्यासाठी रविवारपर्यंत (दि.१२) रंगमंदिर बंद राहणार आहे.
रंगमंदिरातील ‘एसी’ बसविण्याचे काम सोमवारपासून (दि.६) सुरू झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत नाट्यगृहात असलेले कार्यक्रम रद्द केले आहेत. खरंतर गेल्यावर्षीच बालगंधर्व रंगमंदिरात देखभाल-दुरुस्तीचे काम झाले होते. त्यामुळे नाट्यगृहाला चांगले नवीन रूप मिळाले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी कलाकारांकडून रंगमंचावरील एसी यंत्रणा चालत नसल्याची तक्रार झाली. परिणामी नवीन एसी बसवावा लागत आहे. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर बंद करण्यात आले.
‘बालगंधर्व’चे कॅफेटेरिया सुरू होणार !
अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिरातील कॅफेटेरिया बंद आहे. ते पुन्हा सुरू होणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड महिन्यांत कॅफेरेटिया सुरू होणार आहे. नाट्यगृहाच्या मागील बाजूस कॅफेटेरियाच्या जागेचे नूतनीकरण केले असून, आता कॅफेटेरियाला नवे रूप मिळणार आहे. रसिकांना वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी अनुभवता यावी, या उद्देशाने या कॅफेटेरियाचे रूप बदलले आहे.
सध्या बालगंधर्व रंगमंदिरात नवीन ‘एसी’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे म्हणून दुरुस्तीसाठी काही दिवस नाट्यगृह बंद राहील. कला सादर करताना कलाकारांना चांगली सुविधा मिळावी, म्हणून रंगमंचावर नवीन ‘एसी’ यंत्रणा बसविली जात आहे. - राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, नाट्यगृह विभाग, महापालिका