गरिबी निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: February 13, 2017 02:03 IST2017-02-13T02:03:40+5:302017-02-13T02:03:40+5:30
भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत.

गरिबी निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा
पुणे : भारतात गरिबीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून, समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्कही अद्याप पोहोचले नाहीत. तसेच शहरातील रस्त्यांवर भीक मागून जगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे लाजिरवाणे चित्र बदलण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी लायन्ससारख्या समाजसेवी संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यास समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी हे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. तसेच लायन्स क्लब्सने केलेल्या विविध कार्याचे कौतुक केले.
लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त लायन्स क्लब्सच्या माध्यमातून सलग ५० व २५ वर्षे सेवा करणाऱ्या लायन्स सदस्यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना लायन्स शताब्दी पुरस्कार देण्यात आला. त्यात ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश देसाई, डॉ. मधुसूदन झंवर, नितीन देसाई, डॉ. अभय मुथा, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अभय सदरे यांचा समावेश होता. या वेळी उद्योजक अरुण फिरोदिया, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक
प्रवीण छाजेड, माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, दीपक शहा,
फत्तेचंद रांका, द्वारका जालान, रेखा शेट्टी, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘‘समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी केवळ सरकारला दोष देणे योग्य नाही. प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपले शहर भिकारीमुक्त बनविण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. केवळ पैशांमुळे सर्व समस्या सुटू शकत नाहीत. पैसे असले, तरी प्रत्येक माणूस आनंदी नाही. गरीब माणसाला प्रेम आणि दयेची गरज आहे. परदेशी राहणाऱ्यांनी आपल्या मातृभूमीला आणि संस्कृतीला विसरू नये.’’
अरुण फिरोदिया म्हणाले, ‘‘चीन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये दीन-दुबळा माणूस दिसत नाही. भारतातच गरिबी का दिसते, याचा विचार करायला पाहिजे. दीन-दुबळ्या लोकांना सशक्त बनवायचे आपले ध्येय असले पाहिजे.’’
आपल्या देशात अनेक प्रौढ मतिमंद लोक महत्त्वाच्या जागांवर बसले आहेत, अशी टीका करून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन आपण जातिव्यवस्थेच्या शापातून मुक्त व्हायला पाहिजे.
पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान संधी मिळावी.’’ कार्यक्रमात के. एच. संचेती, प्रवीण छाजेड आदींनी मनोगत व्यक्त केले.
(प्रतिनिधी)