लासुर्णे : पोलीस व सैन्यदलात नोकरीला लावतो, असे सांगून बेलवाडी (ता. इंदापूर) येथील तरुणाला तब्बल २ लाख ५९ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.शैलेश हनुमंत चव्हाण (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) असे या फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ करियर अॅकॅडमीचा चालक शरद रामभाऊ गायकवाड (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. ओळखीचा व मैत्रीचा गैरफायदा घेत शैलेश चव्हाण या युवकाची गायकवाड याने फसवणूक केली आहे. २०१३-१४ मध्ये गायकवाड याने शैलेश याच्याकडून वरचेवर पैसे घेतले. शैलेश चव्हाण याने प्रत्यक्ष भेटून गायकवाड याला १ लाख रुपये दिले. त्यानंतर गायकवाड याच्या बँक खात्यावरदेखील एकदा १ लाख व ५९ हजार ९०० अशी रक्कम मार्च २०१३ मध्ये जमा केली. याबाबतच्या जमा पावत्या चव्हाण याच्याकडे आहे. पैसे दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने चव्हाण याने गायकवाड याच्याकडे विचारणा केली. तेव्हा नोव्हेंबर २०१६ मध्ये जीआरएफ सेंटर अँड रेकार्ड यांच्याकडील मेजरच्या सही व शिक्क्याचे ‘पायोनिर’ पदासाठीचे कॉललेटर व अॅडमिट कार्ड दिले. या कॉल लेटरप्रमाणे गायकवाड याने शैलेश चव्हाण याला नोकरीस हजर राहण्यास सांगितले. मात्र, सदर ठिकाणी नोकरीस हजर राहण्यासाठी चव्हाण गेला असता, गायकवाड याने दिलेले कॉललेटर व अॅडमिट कार्ड बनावट व खोटे असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याने शैलेश चव्हाण याच्या लक्षात आले. त्यानंतर चव्हाण याने पैशांची मागणी केली असता, गायकवाड उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नोकरीच्या आमिषाने फसवणूक करून २ लाख ५९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी शरद गायकवाड याच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शैलेश चव्हाण याने केली़
तब्बल २ लाख ५९ हजार घेऊन बनावट कॉललेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:57 IST