प्रशांत परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By Admin | Updated: February 23, 2017 02:11 IST2017-02-23T02:11:09+5:302017-02-23T02:11:09+5:30
विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल अपशब्द वापरल्याने आजी-माजी सैनिक

प्रशांत परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
बावडा : विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल अपशब्द वापरल्याने आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. बावड्यात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
निवडणूक प्रचारसभेत आमदार परिचारक यांनी जवानांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. त्यामुळे आजी-माजी जवानांच्या कुटुंबीयांच्या मनावर आघात झाला आहे. परिचारक यांनी माफी मागितली, तरी त्यांना आम्ही माफ करणार नाही, अशी भूमिका या वेळी स्पष्ट करण्यात आली.
प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा बावडा येथे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या वेळी परिचारक यांच्या पुतळ्याची तिरडी बांधून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर बाजारतळावर या पुतळ्यास चपलांनी मारून दहन करण्यात आले. या वेळी बावडा व परिसरातील सर्व आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सैनिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन बावडा पोलिसांना देण्यात आले.
या निवेदनावर माजी सैनिक लक्ष्मण घोगरे, जयवंत घाडगे, भास्कर पांढरे, कुंडलिक सातपुते, शिवाजी पवार, नंदकुमार देशपांडे, प्रकाश कुर्डे, सोपान यादव आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.