आंदोलनाला सईद मिर्झा यांचा पाठिंबा
By Admin | Updated: August 17, 2015 02:22 IST2015-08-17T02:22:06+5:302015-08-17T02:22:06+5:30
एफटीआयआयचे अध्यक्षपद केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित नाही. धोरणात्मकदृष्ट्या या पदाला खूप महत्त्व आहे, असे नमूद करून एफटीआयआयचे माजी अध्यक्ष

आंदोलनाला सईद मिर्झा यांचा पाठिंबा
पुणे : एफटीआयआयचे अध्यक्षपद केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित नाही. धोरणात्मकदृष्ट्या या पदाला खूप महत्त्व आहे, असे नमूद करून एफटीआयआयचे माजी अध्यक्ष सईद मिर्झा यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मिर्झा यांनी रविवारी विद्यार्थ्यांची भेट घेऊन अध्यक्षपदावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद सादला.
अनेक दिवसांपासून चालू असलेला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा लढा हे अन्यायाविरुद्ध चालू असलेले आंदोलन आहे. आणि यासंदर्भात विद्यार्थ्यांना लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षाही मिर्झा यांनी या वेळी व्यक्त केली. मी स्वत: या पदावर काम केलेले असल्याने हे पद केवळ प्रशासकीय कामकाजापुरतेच मर्यादित नाही, तर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचे धोरणात्मक निर्णय अशा सर्वदृष्टीने संस्थेशी संबंध येत असतो. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचे असून अध्यक्ष हा समग्र भूमिका घेणारा असायला हवा. तसे होत नसल्यास त्याबाबतीत शासनाने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या म्हणण्याचा जरुर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन लावून धरावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एफटीआयआयसारख्या संस्थांना स्वातंत्र्य असावे, यासाठी स्वायत्त करण्यात आलेले असताना अशा प्रकारची मनमानी करणे योग्य नाही. एफटीआयआयकडे सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून पाहिले जात असताना अशा प्रकारची हुकूमशाही करणे चुकीचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या म्हणण्यासाठी इतके दिवस लढा द्यायला लावणे ही पण खेदाचीच बाब असल्याचे ते म्हणाले.
या आंदोलनाचा विचार केवळ एका संस्थेचे आंदोलन असा न करता हे देशातील एक आंदोलन आहे, असा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारची आंदोलने केवळ आपल्या देशातच होतात असे नाही तर हा प्रश्न जगभरातील आहे, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)