तुरळक पावसानेही शहरात साचले पाणी
By Admin | Updated: June 21, 2016 00:38 IST2016-06-21T00:38:14+5:302016-06-21T00:38:14+5:30
शहरामध्ये सोमवारी मॉन्सूनचे आगमन होऊन तुरळक पाऊस झाला. मात्र, या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले.

तुरळक पावसानेही शहरात साचले पाणी
पुणे : शहरामध्ये सोमवारी मॉन्सूनचे आगमन होऊन तुरळक पाऊस झाला. मात्र, या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. स्वारगेट, लक्ष्मी रस्ता, हडपसर भागात अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाळी गटारांची स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी ३१ मेपूर्वी नाले, पावसाळी गटारे यांची स्वच्छता पूर्ण केली जाते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाळी कामे पूर्ण झाली नव्हती. टेंडर प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्याने यंदा पावसाळी कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्याचा फटका पहिल्याच पावसामध्ये बसल्याचे दिसून येत आहे.
स्वारगेट बसस्थानकाजवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले. हडपसर येथे गावाच्या वेशीजवळही पाणी साचले होते. या पाण्यातून जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. शहरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनविण्यात आल्याने पाणी साचल्याचे प्रमाण वाढले आहे.
पहिल्या तुरळक पावसाने पाणी साचले आहे. सफाई न झाल्यास आणखी वाईट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(प्रतिनिधी)