‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती...’!

By Admin | Updated: March 27, 2015 00:30 IST2015-03-27T00:30:21+5:302015-03-27T00:30:21+5:30

‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ ,

'Swayam Shrirampragrabhu heard ...'! | ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती...’!

‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती...’!

पुणे : ‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ , ‘सरयू तीरावरी या, दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ अशा गीतांच्या सुरेल गुंफणीतून गीतरामायणाचा सुरेल काळ रसिकांच्या नजरेसमोर तरळला.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘गीतरामायणा’ स यंदाच्या रामनवमीस साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित गीतरामायणाच्या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे. हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘गदिमा’ यांचे लेखन आणि बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या अद्वितीय संगीतातून साकार झालेल्या गीतरामायणाच्या सोहळ्यास या प्रतिभावंत द्वयीबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, बाबूजींचे चिरंजीव आणि गायक व संगीतकार श्रीधर फडके, गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. याप्रसंगी अभय केले,
निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर, संतोष पोतदार,
धनंजय कुलकर्णी व भारतीय
शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गीतरामायणातील प्रत्येक गीत हे दृश्य आणि कडवं हे उपदृश्य आहे. बाबूजींनी गीतरामायण रचले ते शास्त्रीय संगीतावर. जवळपास ३३ रागांचा त्यात समावेश त्यांनी केला होता, अशा गीतरामायणातील प्रत्येक गीतरचनेचे सौंदर्य उलगडत संगीतकार श्रीधर फडके यांनी, ‘सरयू तीरावरी दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ ‘सावळा ग राम ज्येष्ठ तुझा पुत्र’, ‘चला राघव’, ‘रामा चरण तुझे’, ‘आकाशाशी जडले नाते’ ‘निरोप कसला माझा घेता,’ ‘थांब सुमंता’, ‘नकोस नौके परत फिरु’, अशा गीतरामायणातील गीतांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनात गीतरामायणाच्या स्मृती जागृत केल्या.
या वेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर (सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे ओघवत्या शैलीत अत्यंत रसाळ निवेदन धनश्री लेले त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.
संस्कृत पंडित सी. भा. दातार यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गीतरामायणातील चार गाणी नूपुर देसाई, तन्वी केळकर, मिताली जोशी आणि रोहित गुळवणी या सांगलीच्या बालकलावंतांनी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी केले. या वेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या बालकलावंतांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Swayam Shrirampragrabhu heard ...'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.