मुलींकडून उत्तरपत्रिका तपासणारा शिक्षक निलंबित
By Admin | Updated: March 24, 2015 00:24 IST2015-03-24T00:24:36+5:302015-03-24T00:24:36+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेणाऱ्या शिक्षकावर शैक्षणिक संस्थेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली

मुलींकडून उत्तरपत्रिका तपासणारा शिक्षक निलंबित
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेणाऱ्या शिक्षकावर शैक्षणिक संस्थेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्या संदर्भातील अहवाल आनंद विद्यालयाने शिक्षण अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अद्याप हा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मंडळातर्फे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
विमाननगरमधील आनंद विद्यानिकेतन विद्यालयातील शिक्षक दशरथ बेल्हेकर यांनी दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेबाबत आणि मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर काही सामाजिक संघटनांकडून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
दशरथ बेल्हेकर हे आनंद विद्यालयात हिंदी विषयाचे शिक्षक असून, या संस्थेचे आजीव सभासद आहेत. त्यांची या विद्यालयाच्या संस्थेवर विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे बेल्हेकर यांना या विद्यालयात स्वतंत्र कार्यालय देण्यात आले. परंतु, त्यांनी या कार्यालयात नववीच्या तीन विद्यार्थिनींकडून दहावीच्या हिंदीच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. यामुळे संस्थेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या सचिव किरण तावरे म्हणाल्या, की संस्थेने दशरथ बेल्हेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, विद्यालयाने याबाबतचा अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षण अधिकारी उद्या विभागीय शिक्षण मंडळाकडे यासंदर्भातील अहवाल देणार आहेत.