अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्यास अटक
By Admin | Updated: November 20, 2014 04:22 IST2014-11-20T04:22:00+5:302014-11-20T04:22:00+5:30
माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयाच्या उपप्राचार्यास अल्पवयीन विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्यास अटक
येरवडा : माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयाच्या उपप्राचार्यास अल्पवयीन विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ब्रदर सुरेश जॉन पॉल (वय ३०, रा. लोहगाव, मूळ तमिळनाडू) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बाललैंगिंक अत्याचार प्रतिबंधक (पास्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, लोहगाव-वाघोली रस्त्यावर असणाऱ्या वॉटरपार्कजवळील माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयातील उपप्राचार्य हा काही विद्यार्थिंनीबरोबर अश्लील वर्तन करत असल्याची तक्रार विद्यार्थिंनीनी पालकांकडे केली होती. संबंधित उपप्राचार्याविरोधात तक्रार करण्यासाठी पीडित विद्यार्थिंनीचे पालक मंगळवारी सकाळी शाळेत गेले होते. या संदर्भात चौकशी करून कारवाई करू, असे शाळा प्रशासनाने पालकांना सांगितले. या संदर्भात संबंधित उपप्राचार्याविरोधात अनेक विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आल्यावर, पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तर शाळा प्रशासनाने माफी मागून तक्रार दाखल करू नये, यासाठी सारवासारव केली. या संदर्भात लोहगाव परिसरातील स्थानिक कार्यकर्ते समीर खांदवे-पाटील यांनी वाचा फोडली असता, पोलिसांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेच्या उपप्राचार्याविरोधात पास्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित उपप्राचार्याला तत्काळ अटक केली. (प्रतिनिधी)