वर्षाला एक हजार वाहन परवाने निलंबित
By Admin | Updated: February 11, 2016 03:16 IST2016-02-11T03:16:47+5:302016-02-11T03:16:47+5:30
मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पुणेकरांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या अशा तब्बल तीन हजार बेशिस्त

वर्षाला एक हजार वाहन परवाने निलंबित
पुणे : मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पुणेकरांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या अशा तब्बल तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर गेल्या तीन वर्षांत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, या वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येतात.
गेल्या काही वर्षात शहरातील सार्वजनिक वाहनांचा आकडा २५ लाखांच्या वर गेला आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांमधील जवळपास ७० ते ७५ टक्के वाहने दररोज शहरातील रस्त्यांवर धावत असतात. मात्र, यातील अनेक वाहनचालक राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून मद्य प्राशन करून तसेच मोबाइलवर बोलत वाहने चालवितात. शहरात वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. गेल्या तीन वर्षांत तब्बल ४ हजार ३५३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ३ हजार चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले
आहेत. ही आकडेवारी पाहता वर्षाला एक हजार तर दर दिवशी अवघ्या तीन जणांचे परवाने निलंबित होत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
केवळ महापालिका हद्दीतच कारवाई
वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेली ही तीन वर्षांतील कारवाई केवळ महापालिकेच्या हद्दीतच आहे. यावरून ग्रामीण भागात मोबाइल संभाषण तसेच ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाईच होत नसल्याचे यावरून दिसून येते. तर प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडूनही गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरी भागातील परवानेच निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालय क्षेत्रात कारवाई झाल्याचे या माहितीवरून दिसून येत नाही.
तीन हजार परवाने निलंबित
वाहतूक पोलिसांकडून १ एप्रिल २०१३ ते ८ फेब्रुवारी २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल ४ हजार ३५३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, सुमारे २९९९ वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. हा निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर या वाहनचालकांची पुन्हा वाहन चालविण्याची चाचणी घेऊन त्यांना नवीन परवाने दिले जातात. त्यातील जवळपास २ हजार वाहनचालकांना पुन्हा नवीन परवाने देण्यात आले आहेत.
दिवसाला चार जणांवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता दररोज रस्त्यावर २० ते २५ लाख वाहने असताना, त्यातील ड्रंक अँड ड्राइव्ह आणि मोबाइल संभाषण करणाऱ्या अवघ्या तीन ते चार जणांवर दर दिवशी कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येते. दर वर्षी केवळ ३१ डिसेंबर रोजीच पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. इतर दिवशी केवळ सिग्नल तोडणे अथवा नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यातच पोलिसांकडून धन्यता मानली जाते.