शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड
By Admin | Updated: March 19, 2015 22:52 IST2015-03-19T22:52:08+5:302015-03-19T22:52:08+5:30
आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची हेळसांड झाल्याचा प्रकार ताजा असताना वेल्हे तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडला आहे.

शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड
मार्गासनी : भोर तालुक्यातील नसरापूर येथील आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची हेळसांड झाल्याचा प्रकार ताजा असताना वेल्हे तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडला आहे. शस्त्रक्रियाझालेल्या महिलांना जमिनीवर सतरंजीवरच झोपवण्यात आले होते. माजी सभापती चतुरा नगिने यांनी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कंरजावणे येथे नव्यानेच सुसज्ज अशी इमारती बांधली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १७ मार्च रोजी १५ महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फक्त पाच खाटा उपलब्ध होत्या. उर्वरित महिलांना तेथील एका खोलीमध्ये जमिनीवरच सतरंजी टाकून झोपवण्यात आले होते.
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. माने हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. अतिरिक्त कार्यभार असलेल्या डॉ. माधवी शिंदे यांनी या वेळी बोलताना, ‘‘माझ्याकडे अचानकपणे हा अतिरिक्त कार्यभार टाकण्यात आल्याने तातडीने सुविधा करता आल्या नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना रुग्ण महिलांना सुविधा देण्याबाबत सांगूनदेखील त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही,’’ असे सांगितले.
या वेळी महिला रुग्ण सारिका सागर वालगुडे, अनिता यादव यांच्या नातेवाइकांनीदेखील तक्रारींचा पाढा वाचला. मागील शस्त्रक्रिया कॅम्पच्या वेळीदेखील असाच प्रकार झाला होता. त्या वेळी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यावर सुधारणा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्यांनी दिली होती. परंतु, आजच्या प्रकाराने त्यामध्ये काही सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
वास्तविक, या रुग्णालयात १३ खाटा उपलब्ध आहेत. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या सर्व खाटा वापरात नाहीत. फक्त पाचच खाटा वापरात आहेत. (वार्ताहर)
हे प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या दर्जाचे आहे. काही त्रुटी असतीलही. शिबिराच्या वेळी महिलांच्या शस्त्रक्रियांची मागणी जास्त असते. आपल्याकडे खाटांचे प्रमाण कमी असते. आम्ही त्यांना सांगूनही त्या आग्रही असतात. त्यांच्या मागणीनुसारच या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यांना गाद्या, रजईची योग्य व्यवस्था केली जाते. या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले आहे, याची माहिती घ्यावी लागेल.
- डॉ. एन. डी. देशमुख ,
जिल्हा आरोग्य अधिकारी
४करंजावणे येथे एक कोटी ३० लाख रुपये खर्चातून अद्ययावत असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे.
४वर्षभरापासून हे रुग्णालय चालू करण्यात आले आहे; मात्र तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्याचा योग्य वापर होत नाही.
४रुग्णालयात पाण्याची गैरसोय असून, त्यामुळे शौचालय
व इतर ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही. शिवाय, स्वतंत्र
स्वच्छता कर्मचारीदेखील नेमण्यात आला नाही.