सर्व्हे झाले; उपाययोजनांचे काय?
By Admin | Updated: May 10, 2017 03:48 IST2017-05-10T03:48:33+5:302017-05-10T03:48:33+5:30
बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

सर्व्हे झाले; उपाययोजनांचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर नाशिक (मेरी) या संस्थेने धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. मात्र, गाळ काढण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. धरणात जवळपास १० टक्के गाळ साचला असून, तो बाहेर काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
भोर तालुक्यात १९२७ साली ब्रिटिशांनी वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. धरणाची पाणी साठवण क्षमता २२ टीएमसी असून, पाण्याचा फुगवटा सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत पसरतो. धरण बांधून ९० वर्षे झाली. मात्र, अद्याप एकदाही धरणातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील उंचीवर असलेल्या डोंगर दऱ्यातील माती उताराने ओढे, माती, पालापाचोळा झाडेझुडपे दगडगोटे दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येतात. यामुळे धरणात गाळाचे थरच्या थर साचले आहे. धरणात सुमारे ८ ते १० टक्के गाळच साचला आहे. हा गाळ बाहेर काढला तर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. सध्या भाटघर धरणात १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा सर्व गाळ असून धरणाने तळ गाठला आहे. मात्र, धरणातील गाळ काढला तर हाच पाणीसाठा दुप्पट होणार आहे. त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. नीरादेवघर धरण बांधून २० वर्षे झाली. धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, मागील २० वर्षांत एकदाही गाळ काढला नसल्याने धरणात गाळाचे थर साचले आहेत. यामुळे धरणातील पाणीसाठा कमी दिसत आहे. सदरच्या दोन्ही धरणांतील गाळ काढल्यास धरणात ८ ते १० टक्के पाणीसाठा वाढणार आहे.धरणातील गाळ काढण्याचे सध्या शासनाचे धोरण असून, तसे झाल्यास भोर तालुक्यातील दोन्ही धरणांतील १५ ते २० टक्के पाणीसाठा वाढणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे.