पाणी देण्याचे भाजपाकडून समर्थन
By Admin | Updated: May 4, 2016 04:33 IST2016-05-04T04:33:35+5:302016-05-04T04:33:35+5:30
पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली.

पाणी देण्याचे भाजपाकडून समर्थन
पुणे : पाण्याचे राजकारण करणारी अभद्र युती, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांकडून संभावना करण्यात आली. या तिन्ही पक्षांनी दौंड-इंदापूरला खडकवासला धरणातील पाणी कालव्याने देण्यास विरोध केला असून, असा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर तीव्र टीका केली आहे. हेच कारण देत भाजपाचा विरोध दुर्लक्षित करून महापालिकेची सर्वसाधारण सभाही तहकूब करण्यात आली.
सभा तहकुबीनंतर लगेचच पत्रकारांशी बोलताना भाजपाचे पालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी पत्रकारांशी संपर्क साधत तिन्ही पक्षांवर टीका केली. नगरसेवक अशोक येनपुरे, मुक्ता टिळक, मनीषा घाटे या वेळी उपस्थित होते. बिडकर म्हणाले, ‘‘आमची चर्चेची तयारी होती, त्यातून पुणेकरांना पालकमंत्री बापट यांचा निर्णय कसा योग्य आहे, ते समजले असते. पण, त्यांना पाण्याचे राजकारण करायचे होते, त्यामुळे त्यांनी चर्चा होऊ न देता सभा तहकूब केली.’’ या अभद्र युतीतील मनसेच्या राजकारणाची सर्वांना माहिती आहे. पालिकेतील आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकत त्यांनी राष्ट्रवादीला सोयिस्कर भूमिका घेतली आहे, असे सांगत बिडकर यांनी मनसेला धारेवर धरले.
पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. पाऊस सर्वांचाच असतो, त्यामुळे त्याच्या पाण्यावरही सर्वांचाच हक्क आहे, असे स्पष्ट करून बिडकर म्हणाले, ‘‘दौंड-इंदापूरची पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना पाणी देणे गरजेचे होते. ते देताना पुण्याला कसलीही पाणीकपात होणार नाही. पाण्याच्या एकूण साठ्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी पळविले जाणार नाही, शेतीला वापरले जाणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात आली आहे, मात्र तरीही पाण्याचे राजकारण केले जात आहे.’’
दौंड-इंदापूरला पाणी सोडल्यास खडकवासला धरणात किती पाणी राहणार, ते पुण्याला किती दिवस पुरेल, याबाबत विचारले असता बिडकर आकडेवारी न देता प्रशासनाला सर्व माहिती आहे, असे सांगितले. धरणातील पाण्याचा तळ गाठला गेला आहे, त्यामुळे पुण्याच्या मध्यभागात गढूळ पाणी येण्यास सुरुवात झाली आहे याकडे लक्ष वेधले असता बिडकर यांनी पुण्याच्या एखाद्या भागात असे पाणी आले असेल, पण तो तांत्रिक दोष आहे, असे उत्तर दिले. टँकरने पाणी देणे अव्यवहार्य असल्यामुळेच पाणी कालव्याने देण्याचा निर्णय झाला, असा दावा त्यांनी केला.(प्रतिनिधी)