सूर्यकांत मांढरे कलादालनावर हातोडा

By Admin | Updated: March 26, 2015 00:26 IST2015-03-26T00:26:44+5:302015-03-26T00:26:44+5:30

मोठा गाजावाजा करीत लाखो रुपये खर्चून सहकारनगर येथे साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे कलादालनावर महापालिकेनेच हातोडा मारला आहे.

Sunkant hood | सूर्यकांत मांढरे कलादालनावर हातोडा

सूर्यकांत मांढरे कलादालनावर हातोडा

पुणे : मोठा गाजावाजा करीत लाखो रुपये खर्चून सहकारनगर येथे साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे कलादालनावर महापालिकेनेच हातोडा मारला आहे. मांढरे यांचे फोटो आणि त्यांना मिळालेली पारितोषिके अक्षरश: अडगळीत टाकण्यात आली आहेत. या प्रकाराने मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांना मानसिक धक्का बसला असून, या प्रकाराबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे.
सहकारनगरातील वसंतराव बागुल उद्यानामधील पंडित भीमसेन जोशी कलादालनातील दुसऱ्या मजल्यावर मांढरे कलादालन साकारण्यात आले होते. या कलादालनाच्या ठिकाणीच भवन विभागाकडून स्केरी मिरर प्रकल्प उभारण्यात आला आहे.
महापालिकेकडून २००९ मध्ये मांडरे यांचे कलादालन उभारण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या ठिकाणी मांढरे यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून मांढरे यांनी काढलेली पेंटिंग, त्यांचे फोटो तसेच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी करार करण्यात आला. त्यानुसार, या सर्व वस्तू कलादालनात लावण्यात आलेल्याही होत्या. तसेच गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांकडून त्याबाबत कौतुकही केले जात होते.
मात्र, उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रस्तावानुसार, या कलादालनात स्केरी मेझ (काचेच्या आरशांचा भुलभुलैया) करण्याचे काम भवन विभागाकडून हाती घेण्यात आले. तसेच या कामासाठी मांढरे यांचे फोटो तसेच त्यांची पारितोषिके काढून ती एका अडगळीत टाकण्यात आली आहेत. तर अनेक पारितोषिकेही गायब आहेत.
ही बाब लक्षात आल्यानंतर मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांना धक्काच बसला आहे. त्यांनी या प्रकाराबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही बाब अत्यंत अपमानास्पद असून, हे कलादालन तत्काळ आहे तसे करावे, अशी मागणी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
(प्रतिनिधी)

४सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात एका कलाकाराच्या आठवणींचा असा अपमान होणे, ही बाब लज्जास्पद असून, या प्रकारास दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. हे कलादालन पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. उपाध्यक्ष निहाल घोडके, शंतनू खिलारे या वेळी उपस्थित होते.

आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
४मांढरे कलादालनाची तोडफोड करून त्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मिररमेझबाबत मांडरे यांचा मुलगा प्रकाश मांढरे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश २ मार्च रोजी मालमत्ता व व्यवस्थापन विभागास दिले. या पत्रानुसार, मालमत्ता विभागाने या कलादालनात सुरू असलेले मिररमेझचे काम थांबविले जावे अथवा त्याला स्थगिती दिली जावी यासाठीचे आदेश भवन विभागास दिले जावेत, यासाठीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यापुढे त्याच दिवशी ठेवला. मात्र, तो प्रस्तावही अडगळीत पडला असल्याचे समोर आले असून, आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊनही गेल्या २२ दिवसांपासून या पत्रावर काहीच कारवाई झालेली नाही.

कामाबाबतही घोळ
४प्रत्यक्षात हे मिररमेझ बांधण्याचे काम भवन विभागाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, भवन विभागाकडे चौकशी केली असता, हे काम तांत्रिक विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तर या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे उद्यान विभागाचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम नेमके कोण करतेय, हा प्रश्न असून अतिरिक्त आयुक्त कोणाला काम थांबविण्याच्या सूचना देणार, असा सवाल या उपस्थित होत आहे.

मांढरे यांचे कलादालन मिररमेझसाठी काढण्यात आले असले तरी, ते दुसऱ्या मजल्यावर राहील. कलादालनाबाबत मांढरे कुटुंबीयांसोबत कुठलाही करार झालेला नाही. ही गॅलरी दुसऱ्या मजल्यावर असल्याने ती पाहण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी भुलभुलैय्या करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, तर मांढरे गॅलरी पहिल्या मजल्यावर हलविण्यात येणार आहे. - आबा बागुल,
उपमहापौर

 

Web Title: Sunkant hood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.